Join us

‘देवडीकरचा संबंध दाभोलकर, पानसरे हत्येशी होता का?’

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2020 3:36 AM

हृषीकेश देवडीकर उर्फ मुरली याचा संबंध ज्येष्ठ विचारवंत नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणाशी होता का,

मुंबई : पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या हृषीकेश देवडीकर उर्फ मुरली याचा संबंध ज्येष्ठ विचारवंत नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणाशी होता का, याची माहिती घेतली जाईल. आवश्यकता भासल्यास राज्याचे पोलीस कर्नाटकमध्ये त्यासाठी जातील, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शुक्रवारी येथे पत्रकारांना सांगितले.दाभोलकर, पानसरे आणि कर्नाटकातील ज्येष्ठ विचारवंत एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्या आणि त्यामागील कारस्थान यांचा परस्पर संबंध होता, असे विशेष चौकशी पथकास आढळले होते. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये आरोपींना महाराष्ट्र एटीएसने अटक केली होती. त्यातील एकाचा दाभोलकर यांच्या हत्येशी तर दुसऱ्याचा गौरी लंकेश यांच्या हत्येशी संबंध असल्याचे म्हटले गेले.>न्या. लोया मृत्यूप्रकरण चौकशीचा योग्य वेळी निर्णयसीबीआय कोर्टाचे विशेष न्यायाधीश बी. एच. लोया यांच्या कथित संशयास्पद मृत्यूबाबत फेरचौकशी करायची की नाही याबाबतचा निर्णय योग्य वेळी घेण्यात येईल. सध्या त्याबाबत मी बोलणार नाही, असे अनिल देशमुख यांनी एकाच्या प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले. लोया यांच्या मृत्यूप्रकरणी काही नवीन पुरावे हाती आल्यास चौकशी केली जाऊ शकते, असे संकेत देशमुख यांनी दिले. न्या. लोया यांच्या मृत्यू प्रकरणाची पुन्हा चौकशी करा, अशी मागणी करण्यासाठी काही लोक देशमुख यांना गुरुवारी भेटल्याची माहिती आहे.