देवेंद्र फडणवीसांनी दौरे करण्यासाठी ई-पास काढलाय का?, माहिती अधिकारात विचारला प्रश्न
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2021 07:39 AM2021-05-20T07:39:51+5:302021-05-20T07:43:33+5:30
देवेंद्र फडणवीस यांनी रायगड दौऱ्यात, चक्रीवादळाने झालेले नुकसान मोठे आहे. राज्य सरकारने तातडीने भरघोस नुकसान भरपाई द्यायला हवी, अशी मागणी केली आहे.
मुंबई - कर्नाटक, गोवा, महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर मोठा तडाखा दिल्यानंतर तौक्ते चक्रीवादळ गुजरातमध्ये धडकले. यामुळे कोकणासह गुजरातमधील अनेक भागांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी गेल्या २ ते ३ दिवसांपासून वीज गायब असून, शेकडो झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी रायगड जिल्ह्याचा दौरा करून परिस्थितीची पाहणी केली. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी दौरा करण्यासाठी ई-पास काढलाय का, प्रश्न एका आरटीआय कार्यकर्त्याने मुख्य सचिवांना विचारला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी रायगड दौऱ्यात, चक्रीवादळाने झालेले नुकसान मोठे आहे. राज्य सरकारने तातडीने भरघोस नुकसान भरपाई द्यायला हवी, अशी मागणी केली आहे. (bjp devendra fadnavis demands immediate compensation for tauktae cyclone in raigad). मात्र, त्यांच्या दौऱ्यावरच आता प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सध्या राज्यभर दौरे करत आहेत. मात्र, त्यांच्या या दौऱ्यांत करोना संबंधीच्या नियमांचे उल्लघन होत असल्याची तक्रार कोपरगाव येथील आरटीआय कार्यकर्ते संजय काळे यांनी केली आहे.
📍Vave village, Raigad.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 19, 2021
Houses have collapsed too. So, a problem regarding shelter too has arisen here due to #CycloneTaukte.
वावे येथे घर कोसळले आहे. त्यामुळे लोकांच्या राहण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. काही ठिकाणी नागरिकांच्या भेट घेऊन त्यांच्याशीही संवाद साधला. pic.twitter.com/03aiwt7rvF
देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी कोपरगावचा अचानक दौरा केला होता. या दौऱ्याच्या अनुषंगाने काळे यांनी माहितीच्या अधिकारात राज्याच्या मुख्य सचिवांकडे अर्ज केला आहे. त्यामध्ये फडणवीस यांनी जिल्ह्याची सीमा ओलांडण्यासाठी नियमानुसार अर्ज केला आहे का, याची माहिती मागविली आहे. राज्यभर दौरे करणाऱ्या फडणवीस यांच्या दौऱ्यावर प्रथमच अशी हरकत नोंदविण्यात आली आहे.
भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी सुरू केलेल्या कोविड केअर सेंटरला देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली होती. त्यावेळी करोनासंबंधीच्या नियमांचा भंग झाल्याची तक्रार काळे यांनी केली आहे. त्याअनुषंगाने मुख्य सचिवांकडे माहितीच्या अधिकारात त्यांनी अर्ज केला आहे. कोपरगावमधील या कार्यक्रमास येण्यासाठी फडणवीस यांनी जिल्हा बदलासाठी आवश्यक असणारा ई-पास काढला होता का? दहा पेक्षा जास्त लोकांची गर्दी करण्यास मनाई आहे, असे असताना फडणवीस यांच्या कार्यक्रमासाठी एवढे लोक एकत्र येण्यास परवानगी दिली होती का? यासंबंधी पोलीस, तालुका किंवा जिल्हा प्रशासनाने कारवाई केली असल्यास त्याचा तपशील मिळावा, अशी माहिती काळे यांनी मागविली असून त्यासोबत कार्यक्रमांचे व्हिडिओ आणि छायाचित्रेही पाठविली आहेत.
कोकण किनारपट्टीला तडाखा
कोकण किनारपट्टीला निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसल्यानंतर अवघ्या वर्षभरातच पुन्हा कोकणातील सिंधुदुर्ग, रायगड या जिल्ह्यांना तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. भाजपचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या रायगड जिल्ह्याला भेट दिली. रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
भरघोस नुकसान भरपाई द्यायला हवी
निसर्ग चक्रीवादळाची भरपाई अजून मिळाली नाही, आता वर्षभरातच या नागरिकांना दुसरा फटका बसला आहे. रायगडमध्ये जे नुकसान झालंय, त्याचा आढावा आम्ही घेतला आहे. जवळपास ८ ते १० हजार घरांचे नुकसान झाले असून, विशेषत: ५ हजार हेक्टरमध्ये फळपिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. उन्हाळी तांदूळ, इतर फळपिकांचे नुकसान झाले. जवळपास २०० शाळांचे नुकसान झाले आहे. २५ वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या इमारतींचे मोठे नुकसान झाले आहे, अशी माहिती देत सरकारने तातडीने भरघोस नुकसान भरपाई द्यायला हवी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली.