Join us

'द केरळ स्टोरी' पाहणाऱ्या फडणवीसांनी 'महाराष्ट्राचा शाहीर' पाहिला का? रोखठोक सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2023 9:16 AM

मंगळवारी सायंकाळी मेडिकल चौकाजवळील मॉलमधील थिएटरमध्ये फडणवीस हे भाजपचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसह चित्रपट पहायला पोहोचले.

मुंबई  - कर्नाटकमध्ये भाजपला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. द केरळ स्टोरी चित्रपटाचा मुद्दा घेऊन भाजपने निवडणुकांत प्रमोशनाचा फंडा वापरला पण तेथील जनतेनं काँग्रेसलाच कौल दिला. 'द काश्मीर फाईल्स'नंतर आता ‘द केरल स्टोरी’ चित्रपटावरून देशातील वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे. काही जण या चित्रपटाचे समर्थन करत असून, काही जण या चित्रपटाविरोधात सूर आळवत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील नागपुरात रात्री ९च्या सुमारास हा चित्रपट पाहिला. त्यावरुन, आता शिवसेना प्रवक्ता आणि खासदार संजय राऊत यांनी रोखठोक सवाल केला आहे. 

मंगळवारी सायंकाळी मेडिकल चौकाजवळील मॉलमधील थिएटरमध्ये फडणवीस हे भाजपचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसह चित्रपट पहायला पोहोचले. चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या देशातील विदारक सत्य समोर आणण्यात आले आहे. आपला देश पोखरण्याचे काम काही जणांकडून सुरू आहे. महिला व तरुणींची दिशाभूल करत त्यांना षडयंत्रात ओढले जात आहे. या गोष्टी समोर आल्या पाहिजे. या चित्रपटामुळे देशात मोठ्या प्रमाणात अनेक लोकांचे डोळे उघडत आहेत, असे फडणवीस म्हणाले. आता, फडणवीसांच्या या कृतीवरुन संजय राऊत यांनी फडणवीसांना टोला लगावला आहे. तसेच, महाराष्ट्राचा शाहीर या चित्रपटाकडे त्यांनी पाठ फिरवल्याचेही राऊत यांनी म्हटलंय. 

देवेंद्र फडणवीस यांनी शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित 'महाराष्ट्र शाहीर' हा चित्रपट पाहिला की नाही? पण त्यांनी वाजतगाजत 'प्रोपोगंडा' करत 'केरला स्टोरी' पाहिला आणि महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी वणवण भटकणाऱ्या, महाराष्ट्राला जाग आणण्यासाठी डफावर थाप मारणाऱ्या शाहिरांकडे पाठ फिरवली. मुख्यमंत्री शिंदे हे सातारचे. शाहीर साबळेंसारखी महान विभूती साताऱ्यात जन्मास आली व महाराष्ट्राच्या निर्मितीत त्यांचे मोलाचे योगदान होते. शिवसेनेच्या जडणघडणीतही ते होते. याची माहितीही सातारच्या मुख्यमंत्री शिंदे यांना नसेल, पण 'केरला स्टोरी'चे तुणतुणे वाजवत आज भाजपवाले फिरत आहेत, अशा शब्दात राऊत यांनी शिंदे-फडणवीसांवर निशाणा साधला. दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यात महाराष्ट्राचा शाहीर हा चित्रपट तीन दिवस मोफत दाखवला आहे. 

जितेंद्र आव्हाडांकडून मोफत शो

नेते मतांसाठी चित्रपट बनवायला सांगतात आणि फुकटात दाखवतातही. द्वेश .. आग … मत… ह्यासाठी पाहिजे ते. आम्ही ठाण्यात प्रभात टॉकिजला महाराष्ट्र शाहीर ह्या चित्रपटाचा शुक्रवार, शनिवार, रविवारी संध्याकाळी ७ वाजताचा शो लावला आहे. जाहीर आमंत्रण … मराठी वर प्रेम करणाऱ्या प्रत्यकासाठी हा शो विनामूल्य आहे. आपले संस्कार, संस्कृति आणि इतिहास आपल्याला माहीत असायलाच हवा , असे म्हणत आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये दिग्दर्शक केदार शिंदे यांना मेन्शन केलंय.  

टॅग्स :देवेंद्र फडणवीससिनेमासंजय राऊतशिवसेना