मुंबई : आज उद्या करत अंधेरी पूर्व व पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाचे काम येत्या डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल असा दावा पालिकेकडून करण्यात आल्यानंतर आता गोखले पुलासाठी मुंबईकरांना नवीन वर्षाची वाट पाहावी लागणार आहे. गर्डरचे सुटे भाग मुंबईत दाखल झाले असून यंदा दिवाळीपर्यंत म्हणजे नोव्हेंबरमध्ये गोखले पुलाची एक बाजू सुरू करण्याच्या दृष्टीने कामे वेगाने केली जात असल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली होती. मात्र गर्डर लॉंच करणे, तो पुढे सरकवणे आणि त्यानंतर तो योग्य ठिकाणी बसविणे ही महत्त्वाची कामे असून गोखले पुलाला अडथळा ठरणारी १३ बांधकामे हटवावी लागणार आहेत. या संदर्भातील मंजुरी आयुक्तांकडे प्रलंबित असून रेल्वे प्रशासनाकडून या कामासाठी ब्लॉकची परवानगी लागणार असल्याने गोखले पुलाची डेडलाइन पुन्हा एकदा हुकली आहे.
मुंबई पालिकेचे वरिष्ठ अधिकारी आणि आमदार अमित साटम यांनी सोमवारी गोखले उड्डाणपुलाच्या कामाचा आढावा घेतला. रेल्वे हद्दीतील मार्गावर पुलाचा भाग येत असून या पुलावर गर्डर टाकण्याचे काम सप्टेंबरअखेरीस पूर्ण केले जाणार होते आणि त्यानंतर स्लॅब टाकण्यासह अन्य कामे केली जाणार होती. दिवाळीपर्यंत एक मार्गिका सुरू करणे आणि डिसेंबर २०२३ अखेरीस पालिकेकडून संपूर्ण पूल खुला करण्यात येणार होता. मात्र पुलाचे बांधकाम सुरू करण्यापूर्वी ३२ बांधकामे हटवावी लागणार आहेत. यातील १३ बांधकामे निवासी स्वरूपाची आहेत.
नागरिक वाहतूककोंडीने हैराण ३ जुलै २०१८ ला कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला होता. ७ नोव्हेंबर २०२२ पासून पूल वाहतुकीसाठी बंद केला आहे. सध्या, या परिसरात वाहन चालकांसाठी अंधेरी भुयारी मार्ग आणि विनायक गोरे उड्डाणपूल हे दोन पर्यायी मार्ग आहेत.
गोखले पुलाच्या गर्डर एकत्रीकरणाला जवळपास ३० दिवस लागणार आहेत. त्यानंतर त्या गर्डरची उभारणी काळजापूर्वक पुढील १५ दिवसांत करता येणार आहे. यासाठी रेल्वे प्रशासन देखरेख करणार आहे. त्यानंतर पुढील ४० दिवसांत गोखले पुलाचे काँक्रिटीकरण करण्यात येईल आणि त्यानंतर पूल खुला करण्यात येईल अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.