Join us

CSMT यार्डात रेल्वे डब्याला आग लागली की लावली?; संशयाचा धूर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2018 9:29 AM

आगीत कुठलीही जीवितहानी झालेली नसली तरी मध्य रेल्वेचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे.

मुंबई- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 18 जवळील यार्डात उभ्या असलेल्या एक्स्प्रेसच्या बोगीला मंगळवारी दुपारी 2.50 वाजता आग लागली. 2.50 वाजता लागलेली आग 3.40 वाजता आटोक्यात आली. या आगीत कुठलीही जीवितहानी झालेली नसली तरी मध्य रेल्वेचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. आगीत निम्म्याहून अधिक बोगी जळून खाक झालीयार्डात उभ्या असलेल्या स्लिपर च बोगीला आग लागल्यावर बाजूला असलेला एसी कोचचंही आगीमुळे नुकसान झालं. आग पसरू नये म्हणून लगेचच रेल्वे अधिकाऱ्यांनी इतर कोचेस बाजूला केले. 

आग लागल्यानंतर फायर ब्रिगेड घटनास्थळी दाख होण्याआधी अधिकाऱ्यांनी आग लागलेल्या बोगीला जोडून असलेले कोच बाजूला केले तसंच त्या गाडीच्या आजूबाजूच्या गाड्याही दूर केल्या. रेल्वे अधिकाऱ्यांनी अतिशय तत्परतेने ही कामं केली. सुरूवातीला कोचिंग डेपोमधील पाण्याचा वापर करून त्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. फायर ब्रिगेड घटनास्थळी दाखल झाल्यावर या अधिकाऱ्यांनी त्यांनाही मदत केली, अशी माहिती घटनास्थळी असलेल्या मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.  

मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे अधिकाऱ्यांच्या तत्परतेमुळे आग लागलेल्या बोगीपासून जवळच असलेले तीन कोच वाचले. 'आम्ही स्वतः तीन कोच त्या बोगीपासून वेगळे केले व त्यांना दूर ढकललं, असं त्यांनी सांगितलं. दरम्यान, आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अजून स्पष्ट झालं असून प्रकरणाच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. दरम्यान, मुंबई मिररला सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेच्या मागे असणाऱ्या लोकांचा रेल्वे अधिकाऱ्यांकडून तपास केला जातो आहे. एकंदरीत रेल्वेच्या बोगीला आग लागली नसून ती आग लावली असल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे. 'आम्ही फॉरेन्सिक डिपार्टमेंटला घटनास्थळाची पाहणी करायला बोलावलं होतं. या घटनेच्या मागे असणाऱ्यांना आम्ही मोकळं सोडू शकत नाही. तपास संपल्यावरच कारण सांगता येईल. पण आता यार्डातील सुरक्षा वाढविण्याच्या विचारात आम्ही आहोत, अशी माहिती मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक एसके पंकज यांनी दिली आहे.  

टॅग्स :मध्य रेल्वेआग