रेल्वेचे तिकीट मिळेना, परतीचा प्रवास बिकट
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2023 11:45 AM2023-11-22T11:45:31+5:302023-11-22T11:46:31+5:30
फुकट्या प्रवाशांकडून कोट्यवधीचा दंड वसूल
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : उच्च शिक्षण व रोजगाराच्या निमित्ताने नागरिक मुंबईत येतात. परंतु कुटुंबीयांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी ते गावी परत असतात. मात्र, दरवर्षी आरक्षणाची बोंब असते. केवळ दिवाळीच नाही तर दिवाळी पूर्वीही मोठ्या प्रमाणात विना तिकीट प्रवास केला जातो. मध्य रेल्वेवर एप्रिल ऑक्टोबर २०२३ या महिन्यात फुकट्या प्रवाशांकडून १७६.१७ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
सणासुदीच्या काळात रेल्वेमध्ये प्रचंड गर्दी असते. दिवाळीच्या निमित्ताने प्रत्येक जण आपले घर गाठतात. मुंबई-वाराणसी, मुंबई-नागपूर, मुंबई-कोल्हापूर, मुंबई-रत्नागिरी जाणाऱ्यांचे प्रमाण प्रचंड असते. प्रवासासाठी रेल्वे सर्वात सोयीस्कर व सुरक्षित माध्यम आहे. त्यामुळे प्रत्येक प्रवाशाचा ओढा आरक्षण करून आपली सीट बुक करण्याकडे असतो.
९७ दलालीचे गुन्हे दाखल
मध्य रेल्वेच्या २६९ प्रकरणांपैकी २३ एप्रिल ते ऑक्टोबर २०२३ या वर्षात एकट्या मुंबई विभागात दलालीचे ९७ गुन्हे दाखल तर आतापर्यंत ११७ जणांना अटक.
कोणत्या गाड्यांना जास्त मागणी
नागपूर दुरांतो एक्स्प्रेस - विदर्भ एक्स्प्रेस - सेवाग्राम एक्स्प्रेस कोकणकन्या - हुबळी एक्स्प्रेस-महानगरी एक्स्प्रेस कामयानी एक्स्प्रेस.
एप्रिल-ऑक्टोबर २०२३ दरम्यान, विनातिकीट,अनियमित प्रवास आणि बुक न केलेल्या सामानाची एकूण २७.३२ लाख प्रकरणे आढळून आली. जी मागील वर्षीच्या याच कालावधीत २९.१६ लाख प्रकरणे होती.
या विनातिकीट,अनियमित प्रवासातून मिळालेला महसूल एप्रिल-ऑक्टोबर २०२३ या कालावधीत १७६.१७ कोटी रुपयांचा महसूल नोंदवला गेला.
ऑक्टोबर २०२३ या महिन्यात, विनातिकीट/अनियमित प्रवासाच्या व बुक न केलेल्या सामानासह ४. १६ प्रकरणे आढळली आहेत त्यातून २६.६९ कोटींचा दंड मिळाला आहे.