'तसे' कुठलेच पैसे, चेक आम्हाला मिळाला नाही! राजभवनाच्या पत्रामुळे सोमय्या अडचणीत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2022 08:49 AM2022-04-06T08:49:17+5:302022-04-06T09:19:14+5:30
भाजप नेते किरीट सोमय्यांनी लोकवर्गणीतून जमा केलेली रक्कम गेली कुठे? माजी सैनिक पोलीस तक्रार दाखल करणार
मुंबई: महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांना, मंत्र्यांना अडचणीत आणणारे भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या आता स्वत:च अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. राजभवनाकडे करण्यात आलेल्या माहिती अर्जामुळे सोमय्यांच्या अडचणीत भरू पडू शकते. भारतीय नौदलाची विक्रांत युद्धनौका वाचवण्यासाठी सोमय्यांनी लोकवर्गणीतून जमा केलेला निधी राजभवनापर्यंत पोहोचला नसल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत सोमय्यांच्या अडचणी वाढण्याची दाट शक्यता आहे.
२०१३ मध्ये पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना राज्य सरकारनं विक्रांत युद्धनौका वाचवण्यासाठी असमर्थतता दर्शवली. निवृत्त झालेली विक्रांत भंगारात जाऊ नये, त्याऐवजी तिचं रुपांतर म्युझियममध्ये करण्यात यावं अशी भूमिका त्यावेळी भाजपनं घेतली. त्यासाठी किरीट सोमय्यांनी निधी गोळा केला. चर्चगेट स्थानकासह शहरातील विविध ठिकाणांहून त्यांनी विक्रांतसाठी निधी गोळा केला. आपण हा निधी राज्यपाल भवनाकडे पाठवणार असल्याचं त्यावेळी सोमय्यांनी सांगितलं होतं.
सोमय्यांनी लोकवर्गणीच्या माध्यमातून विक्रांत वाचवण्यासाठी गोळा केलेला निधी राज्यपाल भवनापर्यंत पोहोचला का, सोमय्यांकडून किती रक्कम जमा करण्यात आली, अशी विचारणा माहिती अधिकार अर्जातून धीरेंद्र उपाध्याय यांनी राजभवनाकडे केली. त्यावर अशी कोणतीही रक्कम किंवा धनादेश सोमय्यांकडून प्राप्त झाला नसल्याची माहिती राजभवनाकडून देण्यात आली. त्यामुळे सोमय्यांनी विक्रांतसाठी गोळा केलेले पैसे गेले कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे.
विक्रांत युद्धनौकेला ऐतिहासिक महत्त्व आहे. युद्धकाळात तिनं महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे तिचं रुपांतर भंगारात होऊ नये अशी भूमिका सोमय्यांनी घेतली होती. विक्रांत वाचवण्यासाठी त्यांनी निधीही उभारला. मात्र हा निधी राजभवनापर्यंत पोहोचलाच नसल्याची माहिती आरटीआयमधून समोर आली आहे. या प्रकरणी काही माजी सैनिक लवकरच पोलीस तक्रार दाखल करणार आहेत.