Join us  

नाल्यातील गाळ काढला नाही? थेट करा तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2023 11:50 AM

ऑनलाइन प्रणाली विकसित करण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबईत कुठेही कचऱ्याचे ढीग असतील किंवा आपल्या परिसरातील नालेसफाई व्यवस्थित झाली नसेल तर त्याची तक्रार आता मुंबईकरांना थेट पालिकेकडे करता येणार आहे. पालिका प्रशासन मुंबईतील गाळ काढण्याचे काम ३१ मेपर्यंत पूर्ण करणार असून त्यानंतर १ ते १० जूनपर्यंत नागरिकांना आपल्या परिसरातील नालेसफाईबाबत ऑनलाइन तक्रार नोंदविता येणार आहे. त्यासाठी येत्या सोमवारपर्यंत प्रशासनाकडून आवश्यक ती यंत्रणा उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका आयुक्तांना दिल्या आहेत. सोबतच रस्त्यांवरील कचऱ्याची तक्रार करता यावी, यासाठी ऑनलाइन प्रणाली विकसित करण्याच्या सूचनाही केल्या आहेत. पश्चिम उपनगरांमध्ये नाल्यातून गाळ काढण्याच्या कामांची पाहणी मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी केली, त्यावेळी त्यांनी ही सूचना केली. 

स्वच्छ व सुंदर मुंबईसाठी सरकार व पालिका विविध उपाययोजना राबवित आहेत. मुंबईच्या सौंदर्यीकरण प्रक्रियेत विविध प्रकरची रोषणाई, सुशोभीकरणाची कामे हाती घेतली आहेत. त्यामुळे मुंबई स्वछ राहावी यासाठी जागोजागी असणाऱ्या कचऱ्याच्या समस्येवर हा उपाय केला जाणार असून मुंबईकरांना त्याची ही तक्रार करता यावी म्हणून प्रणाली पालिकेकडून विकसित करण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. यासाठी पालिकेकडून स्वतंत्र टीम तयार केल्याचे स्पष्ट केले.  कुठे केली पाहणी?  मुख्यमंत्र्यांनी मिलन सबवे, गोखले पूल, ओशिवरा नदी, पोयसर नदी, लिंक रोड, दहिसर नदी, दहिसर पूर्व व पश्चिम नदी पुनरुज्जीवन, श्रीकृष्ण नगरालगत संजय गांधी राष्ट्रीय अभयारण्य येथे पाहणी केली. यावेळी जोरदार पावसात पाणी साचून मुंबईतील नागरिकांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी नाल्यातून गाळ काढण्याची कामे काटेकोरपणे पूर्ण करावीत, आवश्यक ठिकाणी पाणी साठवण भूमिगत टाक्या, फ्लड गेट्सची यंत्रणा कार्यान्वित करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली.

नागरिकांना त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यापोईसर नदीपात्रात मुसळधार पावसावेळी प्रवाह वाढून आजूबाजूचा परिसर जलमय होतो. त्या वेळी काठावरील नागरिकांना त्याचा त्रास होतो, अशी बाब निदर्शनास आणून देण्यात आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी नदीपात्रातील गाळही त्वरेने उपसून यंदाच्या पावसाळ्यात पाणी साचणार नाही, याची दक्षता घेण्याची सूचना केली.