मुंबई - गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेला अखेर मुहूर्त मिळाला असून शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा झाली. सध्या राजकारणात काही वाईट परंपरा, चाली सुरू आहेत. त्यावर आघात करण्यासाठी ठाकरे-आंबेडकरांची पुढची पिढी एकत्र येऊन देश प्रथम या उद्दिष्टावर काम करणार आहोत, असं सांगत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा मुंबईत करण्यात आली. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरे आणि वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत ही घोषणा केली. या युतीच्या घोषणेनंतर भाजप नेत्यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी प्रकाश आंबेडकर कधी निवडून आलेत का?, असा सवालही केला.
प्रकाश आंबेडकरांनी एकतरी निवडणूक जिंकली का?, प्रकाश आंबेडकरांनी किती दलितांना आत्तापर्यंत मदत केली?, लोकांसाठी काम करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बोलण्याची प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांची पात्रता नाही, अशा शब्दात नारायण राणेंनी शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीवर टीका केली. उद्धव ठाकरेंसोबत आता कोणी उरलंय का? 56 आमदार होते, आता 12 ही उरले नाहीत. त्यांचा एकही कार्यकर्ता जमिनीवर उरला आहे का?, असे अनेक प्रश्नही राणेंनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना विचारले आहेत.
काय म्हणाले उद्धव ठाकरे
या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे म्हणाले की, जनतेला भ्रमात ठेऊन हुकुमशाहीकडे वाटचाल केली जातेय. नको त्या वादात अडकवून आपले इच्छित साधायचं. देशातील लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी, घटनेचे पावित्र्य अबाधित ठेवण्यासाठी शिवसेना-वंचित बहुजन आघाडी एकत्र येत आहे. तळागाळातील जनतेपर्यंत जे काही सुरू आहे ते पोहचवण्याची गरज आहे. निवडणुका आल्यावर गरिबांचा उदोउदो करायचा. निकालानंतर गरीब रस्त्यावर आणि यांची उड्डाणे सुरू होतात त्यासाठी आम्ही एकत्र आलोय असं त्यांनी सांगितले.