Join us

'बाळासाहेबांच्या निधनानंतर शरद पवारांनी ती पोकळी भरून काढली?'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2019 10:03 PM

अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदावरुन झालेल्या वादात भाजप अन शिवसेनेची युती तुटली.

मुंबई - महाराष्ट्रातील राजकीय घडामोडीत संजय राऊत यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत आम्हाला अन्य पर्याय खुले आहेत असं सांगत भाजपाला गर्भित इशारा दिला होता. त्यानंतर मुख्यमंत्रिपदावरुन शिवसेना आग्रही राहिली. शिवसेनेकडून संजय राऊत यांनी वारंवार भाजपावर निशाणा साधला. संजय राऊत यांची पत्रकार परिषद, मॉर्निंग ट्विट आणि सामना अग्रलेख या सर्व बाजूने शिवसेनेने भाजपाची कोंडी केली. भाजपा नेत्यांवर राऊतांनी आक्रमकरित्या केलेल्या टीकेने भाजपा नेतेही संतापले होते. संजय राऊत यांच्या या आक्रमक अन् धाडसी भूमिकेमागे एक व्यक्तीवरील विश्वास होता, तो म्हणजे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार.

अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदावरुन झालेल्या वादात भाजप अन शिवसेनेची युती तुटली. शिवसेनेने राष्ट्रवादी आणि  काँग्रेसची साथ घेत शिवेसेनेचा मुख्यमंत्री केला. 'पंतप्रधान नरेंद्र माेदी किंवा अमित शाह यांच्यापैकी एकाने एक जरी फोन केला असता आणि उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली असती तर युती तुटली नसती' असे वक्तव्य आता खासदार संजय राऊत यांनी एका वृत्तवाहिनीच्या एका कार्यक्रमात केले. त्यासोबतच, संजय राऊत यांनी आपल्याला पूर्णपणे विश्वास होता, महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होईल, असेही स्पष्ट केले. संजय राऊतांच्या या आत्मविश्वासापाठी एका व्यक्तीवरील विश्वास होता, तो म्हणजे शरद पवार. 

शरद पवारांबद्दल लोकांमध्ये संभ्रम आहे, पण मला त्यांच्यावर पूर्णपणे विश्वास होता. दिलेला शब्द पाळण्यात शरद पवार यांचा हातखंडा आहे. शरद पवारांच्या शब्दावर माझा पूर्णपणे विश्वास होता, म्हणूनच मी आत्मविश्वासपणे बोलत होतो. महाविकास आघाडीचं सरकार बनविण्यासाठी शरद पवार यांनाही खूप तडजोडी कराव्या लागल्या आहेत, काँग्रेस नेत्यांसोबत बैठका घ्याव्या लागल्या आहेत. पण, ते हे घडवणारच, असा मला विश्वास होता. महाराष्ट्राला बाळासाहेब ठाकरेंवर जेवढा विश्वास होता, तेवढाच विश्वास शरद पवारांवर आहे. बाळासाहेब यांच्या निधनानंतर शरद पवारांनी ती पोकळी भरून काढली का? असा प्रश्न संजय राऊत यांना विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना, असू शकतं... असू शकतो... असं उत्तर संजय राऊत यांनी दिलंय. एबीपी माझा या वृत्तवाहिनीला संजय राऊत यांनी मुलाखत दिली, त्यावेळी महाविकास आघाडी आणि शरद पवार यांच्याबद्दल ते भरभरून बोलले. विशेष म्हणजे अजित पवार यांच्या शपथविधीनंतरही मी निश्चिंत होतो, कारण मला शरद पवारांवर विश्वास होता, असे संजय राऊत यांनी सांगितलं. 

टॅग्स :संजय राऊतराष्ट्रवादी काँग्रेसशिवसेनाउद्धव ठाकरेशरद पवार