तुमच्या वाहनाची नंबर प्लेट दुसऱ्या कोणी लावली नाही ना?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2023 03:01 PM2023-09-27T15:01:23+5:302023-09-27T15:04:01+5:30
मुंबई वाहतूक पोलिसांकडून वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर व बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कार्यवाहीची मोहीम हाती घेण्यात आली आहे.
मुंबई :
वाहतूक नियमभंग करण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. वाहतूक भंगप्रकरणी दंड बसू नये, म्हणून काही जण थेट दुसऱ्या वाहनाची नंबर प्लेट आपल्या वाहनास बसवून दंड वाचविण्याची नवी शक्कल लढवीत असल्याचे बोलले जात आहे. या संदर्भात गुन्हे दाखल झाले नसले तरी वाहनांवर दंड तर नाही ना, हे नियमित तपासणेही गरजेचे झाले आहे.
मुंबई वाहतूक पोलिसांकडून वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर व बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कार्यवाहीची मोहीम हाती घेण्यात आली आहे. यात ट्रिपल सीट, भरधाव वाहन चालविणे, वाहन चालविताना मोबाइलवर बोलणे, राँग साइड, लायसन्स नसणे आदी प्रकरणी दंड आकारला जात आहे.
मैत्रिणींवर, प्रेयसीवर आपली छाप सोडण्यासाठी अनेक जण विविध प्रयत्न करतात. मात्र, एका महाभागाने तर आपल्या प्रेयसीला खूश करण्यासाठी दुचाकी चोरत असे. या चोर रोमिओला बोरिवली पोलिसांनी ऑगस्टमध्ये सप्टेंबरमध्ये बेड्या घातल्या होत्या.
पोलिसांनी या आरोपीकडून सहा दुचाकी जप्त केल्या आहेत, तर मालेगावातून मुंबईत येऊन वाहनचोरी करणाऱ्या दोघांना माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून चोरी केलेल्या आठ दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. या चोरीच्या दुचाकीची नंबर प्लेट बदलून विक्री केली जाते.
...तर दंडात्मक कारवाई
दुचाकी चालक वाहतुकीचे नियम मोडण्यात आघाडीवर असतात. दररोज वाहतूक पोलिस दुचाकी चालकांना मोटार वाहन कायद्यांतर्गत दंड ठोठावतात. यामुळे दरवर्षी वाहनचालकांना लाखोंचा दंड भरावा लागतो.
महा ट्रॅफिक ॲपवर तपासा दंड
आपल्या वाहनावर किती थकीत दंड आहे, हे मोबाइलवर घरबसल्या पाहता येते. यासाठी ‘महा ट्रॅफिक ॲप’ डाउनलोड केल्यानंतर यात वाहनाचा नंबर व इंजिन नंबर टाकल्यानंतर आपल्या वाहनावर किती दंड आहे, हे कळते.
मूळ मालकाला फटका दुसऱ्याच्या वाहनाच्या नंबर प्लेटचा वापर केला जात आहे, त्यामुळे नियमांचे कोणतेही उल्लंघन केले नसतानाही ज्याच्या नावे नंबर प्लेट आहे, त्या मूळ मालकाला नाहक दंड भरण्याची वेळ येत आहे.