तपास योग्य दिशेने केला का? तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणी हायकोर्टाचा पोलिसांना प्रश्न
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2023 12:01 PM2023-02-03T12:01:51+5:302023-02-03T12:02:11+5:30
टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने केला का, अशी विचारणा उच्च न्यायालयाने पोलिसांकडे केली आहे.
मुंबई : टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने केला का, अशी विचारणा उच्च न्यायालयाने पोलिसांकडे केली आहे.
तुनिषाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी तिचा प्रियकर व अभिनेता शिजान खान (२७) याला पोलिसांनी अटक केली आहे. गुन्हा रद्द करण्यासाठी व याचिकेवरील सुनावणी प्रलंबित असेपर्यंत अंतरिम जामिनावर सुटका करण्यासाठी शिजानने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर न्या. रेवती मोहिते-डेरे व न्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठापुढे गुरुवारी सुनावणी होती.
२४ डिसेंबर रोजी शर्माने सेटवर आत्महत्या केली. आम्ही शर्मा, खान आणि त्यांच्या मित्रांचे मोबाइल फॉरेन्सिक लॅबमध्ये चाचणीसाठी पाठविले असल्याचे सरकारी वकील अरुणा कामत पै यांनी न्यायालयाला सांगितले.
‘शिजानचा ताबा नको’
पोलिस तपास सुरू ठेवू शकता. मात्र, त्यासाठी शिजानच्या ताब्याची आवश्यकता नाही, असे खानचे वकील धीरज मिरजकर यांनी न्यायालयाला सांगितले. तपास योग्य दिशेने करण्यात आला का, असा प्रश्न उच्च न्यायालयाने यावेळी उपस्थित केला. आरोपीने पीडितेला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले का? याबाबीचा तपास करणे आवश्यक आहे, असे मत न्यायालयाने व्यक्त केले. १५ फेब्रुवारी रोजी त्यावर सुनावणी होण्याची शक्यता आहे.