‘जे जे’च्या अध्यापकांनी राजीनामे दिले की नाही? नऊ अध्यापक म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2023 06:05 AM2023-06-01T06:05:59+5:302023-06-01T06:08:08+5:30

लहानेंसह ९ डॉक्टरांचे तडकाफडकी राजीनामे.

Did the professors of J j hospital resign or not ragini parekh tatyarao lahane | ‘जे जे’च्या अध्यापकांनी राजीनामे दिले की नाही? नऊ अध्यापक म्हणतात...

‘जे जे’च्या अध्यापकांनी राजीनामे दिले की नाही? नऊ अध्यापक म्हणतात...

googlenewsNext

मुंबई : सर जे जे रुग्णालयातील नेत्र विभागप्रमुख डॉ. रागिणी पारेख यांच्यासह नऊ अध्यापकांनी बुधवारी राजीनामा दिला. राजीनामा दिलेल्यांमध्ये माजी विभागप्रमुख डॉ. तात्याराव लहाने यांचाही सहभाग आहे. निवासी डॉक्टरांनी केलेल्या चुकीच्या तक्रारीमुळे आणि  गेल्या वर्षभरात रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांनी  केलेल्या छळवणुकीमुळे राजीनामा देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. 

काही दिवसांपूर्वी नेत्र विभागात पदव्युत्तर शाखेच्या पहिल्या आणि दुसऱ्या वर्षाला शिकत असणाऱ्या  २८ निवासी डॉक्टरांनी डॉ. रागिणी पारेख आणि डॉ. तात्याराव लहाने  त्रास देत असल्याची तक्रार राष्ट्रीय वैद्यकीय आयोग, वैद्यकीय शिक्षण विभागाचे मंत्री,  सचिव, संचालक  आणि जे जे रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांकडे केली होती. त्यानुसार या प्रकरणाची चौकशी करण्याकरिता समिती नेमण्यात आली आहे. 

त्या समितीचे अध्यक्ष डॉ. अशोक आनंद यांना केले आहे. काही वर्षांपूर्वी डॉ. अशोक आनंद यांची महिला छळ प्रकरणी डॉ. रागिणी पारेख यांनी चौकशी केली होती. तसेच डॉ. आनंद यांनी डॉ. तात्याराव लहाने यांच्या विरोधात ॲट्रोसिटीची पोलिस तक्रार दाखल केली होती. त्यामुळे या अशा व्यक्तीकडून चौकशी करण्याऐवजी समितीचा अध्यक्ष बदलावा, अशी विनंती करण्यात आली होती. 

मात्र, अधिष्ठात्यांनी तसे न करता चौकशी सुरू ठेवली. यामुळे आकसबुद्धीने ही चौकशी करत असल्याचे अध्यापकांतर्फे सांगण्यात येत आहे. तसेच गेल्या वर्षभरात अधिष्ठात्यांनी या विभागासाठी कोणतीही मदत केलेली नाही, असा आरोपही करण्यात आलेला आहे. 

राजीनामा नाही, रजेचा अर्ज आला आहे

अधिष्ठाता कार्यालयात कोणतेही राजीनामे आलेले नाहीत. डॉ. रागिणी पारेख १५ दिवस रजेवर गेल्याचा त्यांचा अर्ज आला आहे. राजीनाम्याचा अर्ज आलेला नाही. मी कुणाला काय त्रास दिला हे सांगावे. डॉ. लहाने महाराष्ट्र मोतीबिंदू मुक्त कार्यक्रमांतर्गत काम करत आहेत. ते जे. जे. आस्थापनेवर नसल्याने त्यांच्या जे. जे. मधील राजीनाम्याचा प्रश्न येत नाही.     
डॉ. पल्लवी सापळे, अधिष्ठाता

या आहेत मागण्या
यापुढे या विभागाची रुग्ण सेवा सुरळीत ठेवायची असल्यास अधिष्ठात्यांविरोधात योग्य ती कारवाई करावी. निवासी डॉक्टरांना भडकाविणाऱ्या तीन निवासी डॉक्टरांची नोंदणी रद्द करावी तसेच इतर निवासी डॉक्टरांना समज द्यावी. डॉ. रागिणी पारेख यांची स्वेच्छानिवृत्ती मंजूर करावी. त्याचप्रमाणे सर्व अध्यापकांचे राजीनामा मंजूर करून त्यांना कार्यमुक्त करावे. 

यांनी दिले राजीनामे
राजीनामा दिलेल्या अध्यापकांत डॉ. तात्याराव लहाने,  डॉ. रागिणी पारेख, डॉ. प्रीतम सामंत, डॉ. स्वरजित सिंग भट्टी, डॉ. अश्विन बाफना, डॉ. हेमालिनी मेहता, डॉ. शशी कपूर, डॉ. दीपक भट, डॉ. सायली लहाने यांचा समावेश आहे.

Web Title: Did the professors of J j hospital resign or not ragini parekh tatyarao lahane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.