लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: अनेकदा भटक्या आणि विमुक्त जमातीचे लोक लाभास पात्र असूनही शासकीय घरकुल योजनांपासून वंचित राहतात. अशा योजनांसाठी मंजूर निधी अखर्चित राहतो. त्यामुळे अशा विमुक्त जाती, भटक्या जमाती या प्रवर्गातील कुटुंबाचे राहणीमान उंचावण्यासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत घरकुल दिले जाते.
या योजनेंतर्गत निवड झालेल्या विमुक्त आणि भटक्या जमातीच्या कुटुंबास प्रत्येकी ५ गुंठे जमीन देऊन त्यांना २६९ चौरस फुटांचे घर बांधून दिले जाते. उर्वरित जागेवर स्वयंरोजगाराची संधी दिली जाते. मुंबई व बृहन्मुंबई वगळून प्रत्येकी तीन गावे निवडून त्या गावातील कुटुंबीयांना या योजनेचा लाभ दिला जातो. जेणेकरुन विमुक्त आणि भटक्या जमातीच्या कुटुंबास स्वत:चे आणि हक्काचे घर मिळेल. त्यामुळे त्यांचा निवाऱ्याचा प्रश्न कायम स्वरुपी निकाली निघेल.
कोणाला मिळते घरकुल?
गावोगावी जाऊन भटकंती करून उपजीविका करणारे लोकविमुक्त आणि भटक्या जाती जमातीचे लोक
१.२० लाखांचे अनुदान
डोंगराळ भागातील लाभार्थी आणि सर्वसाधारण लाभार्थ्यांना १.२० लाखांचे अनुदान दिले जाते.
कागदपत्रे काय लागतात?
जातीचे प्रमाणपत्र, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, कुटुंब भूमिहीन असल्याचा पुरावा, स्टॅम्प पेपरवर शपथपत्र.