लग्नासाठी सोने घेतले का? दर ८० हजारांवर जाणार, सराफा बाजाराचा अंदाज काय सांगतो?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2024 05:11 PM2024-11-27T17:11:55+5:302024-11-27T17:12:09+5:30
गुंतवणुकीसाठीही खरेदी फायदेशीर, सराफा बाजाराचा अंदाज काय
मुंबई :
आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडींमुळे सोन्याच्या भावात चढ-उतार नोंदविण्यात येत आहेत. सध्या प्रतितोळा ७७ हजार ५०० रुपयांवर असलेला सोन्याचा भाव डिसेंबर अखेरपर्यंत पुन्हा ८० हजारांवर जाईल, अशी माहिती सराफ बाजाराने दिली. अमेरिकेतील अध्यक्ष निवडणूक व युद्ध या दोन कारणांमुळे सोन्याच्या भाव मोठे चढ-उतार झाले होते. आता डिसेंबरमध्ये लग्नसराई असल्याने सोन्याला पुन्हा झळाळी येईल, आणि मोठी खरेदी-विक्री होईल, असा विश्वास सराफ बाजाराने व्यक्त केला आहे.
गुंतवणुकीसाठीही खरेदी फायदेशीर
- जुने सोने मोडून नवे सोने घेतले जात आहे. धनादेश, रोखीसह डेबिट कार्डद्वारे सोन्याची खरेदी विक्री होत आहे.
- सोने खरेदी शुभ मानली जाते. गुंतवणूक वाया जात नाही. शुभकार्यात सोने घेतले जाते. सोन्याच्या बांगड्या, सोन्याचे हार याची खरेदी होत आहे.
- पुरुषांकडून सोनेसाखळी, पेंडंटची खरेदी केली जात आहे.
लग्नसराई असली किंवा नसली काय; त्याने फारसा फरक पडत नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर घडत असलेल्या घडामोडींमुळे सोन्याच्या भावात चढ-उतार नोंदविण्यात येत असतात. डिसेंबरच्या शेवटी सोन्याचा भाव ८० हजार रुपये असेल. युद्ध आणि अमेरिकेच्या निवडणुकीमुळे सोन्याच्या भावात मोठे-चढ उतार नोंदविण्यात आले होते.
- निर्भय सिंग, सुवर्ण विक्रेते
सोन्याच्या भाव कमी होण्याची शक्यता कमीच आहे. कदाचित भाव ८५ हजार रुपये प्रतितोळा रुपयांवर पोहोचेल. अलिकडेच सोन्याचा भाव ८५ हजारांहून ७२ हजार रुपयांवर घसरला होता. आता त्यात पुन्हा वाढ झाली. डिसेंबरच्या शेवटी लग्नाचे मुहूर्त आहेत. त्यामुळे जास्त खरेदी होईल.
- कुमार जैन, अध्यक्ष, मुंबई ज्वेलर्स असोसिएशन
विवाह मुहूर्त
डिसेंबर ३,५,६,७, ११,१२, १४,१५,२०, २३,२४,२६ यादिवशी विवाह मुहूर्त आहेत.