लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : आमदार अपात्रतेच्या निकाल ३१ डिसेंबरपर्यंत लावायचा असून यासाठीची नियमित सुनावणी मंगळवारपासून सुरू झाली आहे. उद्यापासून सलग तीन दिवस मॅरेथॉन सुनावणी होत असून ती पाच, पाच तास चालणार आहे. त्यानंतर तीन दिवसांच्या सुट्टीनंतर २८ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर सलग सात दिवस सुनावणी होणार आहे.
ठाकरे गटाचे पक्षप्रतोद सुनील प्रभू यांच्याप्रमाणेच ठाकरे व शिंदे गटाच्या ज्या याचिका दाखल झाल्या आहेत त्यानुसार प्रत्येक याचिकाकर्त्याची उलटतपासणी करण्यात येणार आहे. शिंदे गटाच्या ताफ्यात महेश जेठमलानी दाखल झाल्याने दोन्ही गटाच्या वकिलांमध्ये जोरदार युक्तिवाद रंगणार आहे.
आमदार अपात्रता प्रकरणात पहिल्याच दिवशी जेठमलानी यांनी सुनील प्रभू यांना प्रश्न विचारताना आपल्या उलटतपासणीची दिशा स्पष्ट केली. प्रभू यांना युतीवरून प्रश्न विचारला व प्रभू हे तितक्याच संयमाने या प्रश्नाला सामोरे गेले तरी ठाकरे गटातील प्रत्येक याचिकाकर्त्याला या प्रश्नाला सामारे जावे लागणार आहे.
विकासाच्या मुद्द्यावर मते मागितलीभाजपसोबत युतीत निवडणूक लढवलीत का? आणि प्रचारात काँग्रेस-राष्ट्रवादीवर टीका केली नाही का, असा प्रश्न जेठमलानी यांनी विचारला असता मला माझ्या पक्षाने एबी फॉर्म दिला होता. त्यानुसार आपण निवडणूक लढविली. मी केवळ माझ्या केलेल्या कामाच्या जोरावर आणि विकासाच्या मुद्द्यावर मते मागितली. त्यामुळे कुणावरही टीका करण्याची वेळ आली नसल्याचे सुनील प्रभू यांनी स्पष्ट केले.