- रतींद्र नाईक
दिवाळीनिमित्त नातेवाईक, आप्तेष्टमंडळी, लहान मुले इतकेच काय तर कॉर्पोरेट कंपन्यांकडून आपल्या कर्मचाऱ्यांना भेटवस्तू देण्याची प्रथा आहे. या गिफ्टमध्ये सुकामेवा, मिठाई, चॉकलेट, शो-पीस, कपडे, इलेक्ट्रॉनिक उपकरणे आदींचा भरणा असतो. दिवाळीच्या निमित्ताने ही गिफ्ट इण्डस्ट्री उजळून निघते. हजारो कोटींची उलाढाल होते...
बाजारपेठेत आकर्षक आणि विविध भेटवस्तू गेल्या आठवड्यातच दाखल झाल्या आहेत. विशेष म्हणजे, दैनंदिन जीवनात वापरता येतील, अशा वस्तू खरेदी करण्याकडे लोकांचा ओढा आहे. वेगवेगळ्या स्वादाचे चॉकलेट बॉक्स, सुकामेवा, स्वयंपाक घरातील इलेक्ट्रॉनिक साहित्य, सजावटीचे साहित्य यांना यंदा जास्त मागणी असून सोन्या-चांदीचे दागिने, चांदीच्या ताट वाटीचा सेट, परफ्यूम, अत्तर, सजावटीचे शो-पीस, लहान मुलांसाठी इलेक्ट्रिक खेळणी या भेटवस्तूंनाही चांगली मागणी असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
मुंबईत लाखो कॉर्पोरेट कंपन्या व त्यांची कार्यालये आहेत यातील काही कंपन्यानी ड्रायफ्रूट बॉक्सची ऑर्डर दिल्याने यंदा ड्रायफ्रूटचा बाजार तेजीत असल्याचे व्यापारी दामजी पटेल यांनी सांगितले, ४२५ पासून ते १,८०० रुपयांपर्यंत मागणीनुसार कंपन्यांना ड्रायफ्रूटचे बॉक्स पुरवले जातात.
इलेक्ट्रॉनिक भेटवस्तूंचा ट्रेंडगेल्या काही वर्षात मार्केटमध्ये इलेक्ट्रॉनिक भेट वस्तू देण्याचा ‘ट्रेंड’ वाढला आहे. स्मार्टफोन, हेडफोन, इस्त्री, लॅपटॉप, टॅब, पॉवर बँक, डिजिटल फोटो फ्रेम, छोटे स्पीकर, एलईडी टेबल लॅम्प या भेटवस्तू कॉर्पोरेट कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना दिल्या जात आहेत. कंपन्या या वस्तू मोठ्या प्रमाणात खरेदी करतात त्यामुळे त्यांना त्या घाऊक किमतीत मिळतात असे जे. पी. इलेक्ट्रॉनिकचे राजीव वघानी यांनी सांगितले.
शेअर्स, ईटीएफचा पर्यायआजकाल अनेक लोक शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवतात. विविध कंपन्यांचे शेअर्स, बॉण्ड, ईटीएफ विकत घेतात. दिवाळी सणाला विविध कंपन्यांचे शेअर्स, बॉण्ड, ईटीएफ भेट म्हणून देण्याचा पर्याय शेअर ब्रोकिंग कंपन्यांनी उपलब्ध करून दिला आहे. दीर्घकाळासाठी गुंतवणूक म्हणून ही भेट उपयुक्त ठरत आहे.
हँडीक्राफ्ट वस्तूंची चलती
हस्तकलेद्वारे तयार करण्यात आलेल्या वस्तू जसे की पणती, ग्रीटिंग, फराळ यांचा एकत्रित बॉक्स देण्याची प्रथा हळूहळू रुळत आहे. कलाकारांनी तयार केलेल्या एकाच बॉक्समध्ये सुगंधी द्रव्य, मोती साबण, ड्रायफ्रूट, चॉकलेट, मिठाई, पणती आणि ग्रीटिंग याचे एकत्रित पॅकेज ग्राहकांच्या पसंतीस उतरत असून सध्या सोशल मीडियावर हँडीक्राफ्ट दिवाळी गिफ्टपॅकच्या रील्स पाहायला मिळतात. कागदांच्या आकर्षक रंगसंगती, हवे तसे गिफ्ट बॉक्स तयार करून घेण्याचा पर्याय त्यात हवे ते ड्रायफ्रूट किंवा फराळ अथवा चॉकलेट निवडण्याची संधी मिळत असल्याने ग्राहकांना हँडीक्राफ्ट वस्तू गिफ्ट म्हणून आवडू लागल्या आहेत. ऑर्डरनुसार किमतीत फरक पडत असला, तरी दीड ते दोन हजार रुपयांपर्यंत असल्याने ग्राहकांच्या खिशाला परवडत आहे. मुख्य बाजारपेठ, मॉल्ससह या गिफ्ट बॉक्सची विक्री व्हॉट्सॲप आणि सोशल मीडियावर होत असून, या पद्धतीमुळे ग्राहकांना यंदा आप्तेष्टांना वैविध्यपूर्ण भेटवस्तू देण्याची संधी मिळते आहे. किफायतशीर दरात बाजारात कायमच उपलब्ध असलेल्या भेटवस्तूंना हा पर्याय ठरत असल्याने ग्राहकांनी यंदा हँडीक्राफ्टीवर भर दिल्याचे वातावरण बाजारात स्पष्ट दिसते.