'लग्न झाले का ?' हा प्रश्न महादेव जानकरांना विचारायला हवा - धनंजय मुंडे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2018 06:41 PM2018-03-26T18:41:17+5:302018-03-26T18:43:16+5:30

धनगर समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी राज्य सरकारने 'टाटा सामाजिक विज्ञान संस्थे'कडे (टीस) जबाबदारी दिली आहे.

'Did you get married?' This question should ask Mahadev Jankar - Dhananjay Munde | 'लग्न झाले का ?' हा प्रश्न महादेव जानकरांना विचारायला हवा - धनंजय मुंडे

'लग्न झाले का ?' हा प्रश्न महादेव जानकरांना विचारायला हवा - धनंजय मुंडे

Next

मुंबई : धनगर समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी राज्य सरकारने 'टाटा सामाजिक विज्ञान संस्थे'कडे (टीस) जबाबदारी दिली आहे. त्यासाठी सरकारने टीसकडे ४० प्रश्न दिलेले आहेत. त्यात 'लग्न झाले आहे का?' हा प्रश्न नमूद आहे. धनगर समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी या प्रश्नाचा काहीच संबंध नाही, असे सांगतानाच हा प्रश्न पहिल्यांदा पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांना विचारायला हवा, अशी कोपरखळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मारली.

अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त कामोठे (नवी मुंबई) येथे 'सर्व पक्षीय धनगर समाज आरक्षण एल्गार मेळाव्या'चे रविवारी आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मुंडे बोलत होते. 'लग्न झाले आहे का?' हा प्रश्न अजब आहे. ४० मुद्द्यामध्ये हा प्रश्न सामाविष्ट करण्याचे खूळ ज्याच्या डोक्यात आले, तो अधिकारी मला भेटला पाहीजे. त्याला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असाही संताप मुंडे यांनी व्यक्त केला.

मुळातच 'टीस' ही स्वायत्त संस्था आहे. या संस्थेला कोणताही संवैधानिक दर्जा नाही. त्यामुळे या संस्थेने दिलेला अहवाल कायदेशीर पातळीवर टिकणार नाही. पण केवळ वेळ मारून नेण्यासाठी राज्य सरकारने 'टीस'कडे अभ्यास करण्याची जबाबदारी सोपविली आहे. 'टीस'चा अहवाल सुद्धा धनगर समाजाच्या विरोधातच येईल, अशी भितीही मुंडे यांनी व्यक्त केली.  

मी धनगर समाजामध्येच लहानाचा मोठा झालो. धनगर वाड्यावर मी बराच काळ राहिलो आहे. धनगर समाजाशी असलेले हे नाते मी विसरणार नाही. म्हणूनच धनगर आरक्षणाच्या प्रश्नावर मी विधानपरिषदेत सतत आवाज उठवत असतो. आरक्षणाच्या या चळवळीत समाजाच्या बरोबरीने लढा देणार असल्याचेही मुंडे यावेळी म्हणाले.  धनगर समाजाने आरक्षणाची चळवळ उभारली. पण या चळवळीचा फायदा महादेव जानकर व राम शिंदे यांनी मंत्रीपद व डॉ. विकास महात्मे यांनी खासदार पद मिळवून घेतला असल्याचा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. 

यावेळी ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख, आमदार रामराव वडकुते, माजी आमदार प्रकाश शेंडगे आदी मान्यवर उपस्थित होते. मुंडे पुढे म्हणाले की, या कार्यक्रम पत्रिकेत जानकर, शिंदे हे सुद्धा उपस्थित राहणार असल्याचे मी वाचले. त्यामुळे त्यांच्या समोरच धनगर आरक्षणाचे काय झाले याचा सोक्षमेक्ष लावण्याच्या उद्देशाने मी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलो, अशा शब्दांत खिल्ली उडवून जानकर व शिंदे यांनी कार्यक्रमाला दांडी मारल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

मंत्रीमंडळाच्या पहिल्याच बैठकीत आरक्षण मंजूर करतो, असे फडणवीस बोलले होते. ही ऑडियो क्‍लिप उपलब्ध आहे. तरीही मी असे बोललोच नाही, असे फडणवीस सांगतात. सत्ताधारी पक्ष खोटे बोलतो. खोटे बोलूनच ते सत्तेवर आले आहेत. दुसऱया बाजूला धनगर समाजामुळेच मी सत्तेवर आल्याचेही फडणवीस मान्य करतात. ज्या धनगर समाजाने तुम्हाला भरभरून मते दिली, त्या समाजाची वारंवार फसवणूक या सरकारने केली आहे. आगामी निवडणुकांमध्ये सत्तेत बदल करायचा की नाही हे धनगर समाजानेच ठरवावे. पण इमानदार माणसेच सत्तेत पाठवा, असे आवाहन मुंडे यांनी केले. 

Web Title: 'Did you get married?' This question should ask Mahadev Jankar - Dhananjay Munde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.