Join us

पोटाच्या आजारांवर कोमट पाण्यात लिंबू-पाणी घेतले का?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2023 2:02 PM

Health Tips: लिंबू हे गुणकारी मानले जाते. आरोग्याच्या  विविध समस्यांमध्ये त्याचा फायदा होत असतो. लिंबू हे पौष्टिक आहे. कारण त्यात ‘व्हिटॅमिन सी’चे प्रमाण भरपूर असते.  यामुळे  शरीराला डिटॉक्स करण्यासही हातभार लागतो. 

मुंबई: सध्याच्या आधुनिक जीवनशैलीमुळे आहार घेण्याची पद्धत बदलली आहे. जंकफूडचे सेवन मोठ्या प्रमाणात केले जात आहे.  त्यातच सध्या पावसाळा सुरू आहे. या काळात रोगप्रतिकारकशक्ती कमी होत असून, साथीच्या आजारांना सुरुवात झाली आहे. या मोसमात रस्त्यावरील खाद्यपदार्थांमधून दूषित पाणी पोटात जाऊ शकते. त्यामुळे निरनिराळया आजारांचा सामना करावा लागतो.

विशेष करून गॅस्ट्रोसारखे आजार आणि पोटाच्या विकाराचे रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येते.  पोटाच्या अनेक विकारांत लिंबू-पाणी सर्वोत्तम असल्याचे आयुर्वेदिकतज्ज्ञ सांगतात.लिंबू हे गुणकारी मानले जाते. आरोग्याच्या  विविध समस्यांमध्ये त्याचा फायदा होत असतो. लिंबू हे पौष्टिक आहे. कारण त्यात ‘व्हिटॅमिन सी’चे प्रमाण भरपूर असते.  यामुळे  शरीराला डिटॉक्स करण्यासही हातभार लागतो. तसेच  लिंबू-पाण्यात अँटिऑक्सिडेंट गुण आढळत असल्याने त्याचा शरीराला अधिक  फायदा होतो. रोज नियमित काळे मीठ घालून लिंबू-पाणी प्यायल्यास पोट साफ होण्यास मदत होते. यामुळे गॅसेसची समस्या दूर होते. पचन सहज होते.  यामुळे आपले वजन कमी होण्यासदेखील फायदा होतो. 

लिंबू-पाणी रोज प्यायल्याने ब्लडप्रेशर आणि हृदयासंबंधीच्या समस्या कमी होण्यास मदत होते. याकरिता लिंबू रसात साखर व मीठ टाकून प्यावे. त्यामुळे  गंभीर आजारातसुद्धा लिंबू-पाण्याचा खूपच लाभ होत असतो. 

 भूक लागत नसेल तर लिंबाचा रसात सैंधव टाकून खाल्ल्यास भूक लागते.  संधिवातासाठी गरम पाणी त्यात अद्रक रस व लिंबूरस आणि काळीमिरी टाकून खावे.  स्थौल्य समस्येसाठी मध आणि गरम पाणी त्यात लिबूरस टाकावा.   केसांतील कोंडा असल्यास लिंबूरस व आवळारस व दही एकत्र करून लावावे. याचा फायदा होतो.

लिंबाचे आरोग्यासाठी गुणकारी फायदे आहेत. त्यामुळे त्याचा अनेकजण आहारात नियमित वापर करीत असतात.  सकाळी रिकाम्या पोटी लिंबू-पाणी प्यायल्याने शरीराला अनेक फायदे होतात; मात्र सर्दी झाल्यास लिंबू-पाणी पिणे टाळायला हवे; तसेच एखाद्या आयुर्वेदिक तज्ज्ञाकडे जाऊन आपण नेमके कोणत्या आजरासाठी लिंबू-पाणी घेत आहोत, हे विचारून घेतले पाहिजे. कोमट पाण्यात लिंबू-पाणी कधी घ्यावे आणि सध्या पाण्यात लिंबू-पाणी कधी घ्यावे, या काही गोष्टी ठरलेल्या आहेत. काही जणांना लिंबू-पाणी चालत नाही त्यांना खोकला येतो.- डॉ. संपदा संत, अधिष्ठता, आर.ए.पोद्दार, आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज

टॅग्स :हेल्थ टिप्स