लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : केंद्र सरकारच्या वतीने २०१५ पासून प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना राबविली जाते. २० रुपयांत दोन लाखांचा विमा दिला जातो. ही एक शुद्ध विमा योजना असून, मृत्यू तसेच अपघाती अपंगत्त्वावरही संरक्षण दिले जाणार आहे. एखाद्या व्यक्तीची जर विविध बँकांत अनेक बचत खाती असतील तर अशी व्यक्ती कुठल्याही एका बचत खात्याद्वारे या योजनेचा लाभ घेऊ शकते. ही योजना एक वर्ष विमा संरक्षण देते, त्यानंतर लाभार्थ्यास या योजनेसाठी नूतनीकरण करावे लागते.
आपल्या बँकेत करा अर्ज
या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या बँकेशी संपर्क साधा. बँकेतर्फे आपल्याला एक अर्ज दिला जाईल व तो भरून अर्जदाराचे आधार कार्ड, ओळखपत्र, जन्माचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, मोबाइल नंबर, पासपोर्ट आकाराचा फोटो सोबत जोडून द्या. यानंतर बँक ऑनलाइन डेबिट पद्धतीने खात्यातून दरवर्षी २० रुपयांचा हप्ता कपात होईल.
काय आहे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ?
- या योजनेंतर्गत २० रुपयांत २ लाखांचा विमा दिला जाईल. या योजनेंतर्गत नैसर्गिक आपत्ती किंवा प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना खुनामुळे विमाधारकाच्या मृत्यू झाल्यास रुपये २ लाख रक्कम त्याच्या वारसाला दिली जाते.
- अपघात किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे जर विमाधारकाच्या डोळ्यांची संपूर्ण आणि कधीही बरी न होणारी हानी म्हणजे कायमस्वरूपी हानी झाल्यास, दोन्ही हात निकामी झाल्यास अथवा दोन्ही पाय निकामी झाल्यास, एक डोळा, एक हात, एक पाय कायमस्वरूपी निकामी झाल्यास २ लाख रुपये प्रदान केले जातात.
- एका डोळ्याची बरी न होणारी हानी झाल्यास, एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास १ लाख रुपये दिले जातात.
कोणत्या आहेत अटी?
देशातील १६ ते ७० वर्षे वयोगटातील सर्व बचत खाते बँकधारक या योजनेला लाभ घेऊ शकतात. लाभार्थ्याजवळ स्वतःचे आधारकार्ड असणे आवश्यक आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांचे बँकेत बचत खाते असणे आवश्यक आहे. कोणत्याही बँकेतून किंवा पोस्ट खात्यातून अथवा सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपनीच्या मदतीने या योजनेचा लाभ घेता येतो.