नवी दिल्ली - राज्याच्या राजकारणात नवाब मलिक यांच्या भूमिकेवरुन रणकंदन सुरू आहे. सध्या विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू असून एकीकडे राज्यातील शेतकरी, महागाई आणि इतर प्रश्न आहेत. तर, दुसरीकडे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचे गंभीर आरोप असलेले राष्ट्रवादीने आमदार नवाब मलिक सत्ताधारी बाकावर बसल्याने गोंधळ सुरू झाला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना पत्र लिहून नवाब मलिक यांना महायुतीत घेता येणार नसल्याचे म्हटले. तर, राष्ट्रवादी अजित पवार गटानेही सावध भूमिका घेतली आहे. आता, याप्रकरणी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी गंभीर आरोप केला आहे.
देशद्रोहाचे आरोप असताना मलिक यांना महायुतीचा भाग करणे योग्य होणार नाही, अशी थेट भूमिका फडणवीस यांनी आपल्या पत्रात मांडली. मात्र, अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही (आज) नवाब मलिक सत्ताधाऱ्यांच्या बाकावर बसल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे विरोधक पुन्हा आक्रमक होण्याची शक्यता आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मात्र, फडणवीसांनी ते पत्र लिहिून सोशल मीडियावर व्हायरल केल्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गट नाराज झाला आहे. तर, दुसरीकडे काँग्रेसनेही गंभीर आरोप करत, फडणवीसांना सवाल केला आहे.
तुम्ही अजित पवारांच्या कानात सांगू शकला असतात, किंवा त्यांना व्यक्तीगत भेटून सांगू शकला असतात. पण, तुम्ही तसं न करता, पत्र लिहून ते सोशल मीडियावर व्हायरल केलं, देशभरात हे सांगितलं. कारण, नवाब मलिक यांचा धर्म, मलिक यांच्या धर्मामुळेच तुम्ही तसं केलं का? असा सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी विचारला आहे. तुम्ही अनेकांना मंत्रिमंडळात घेतलंय, ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. विशेष म्हणजे ज्यांना पंतप्रधानांनी भ्रष्टाचाराचे आरोप करुन प्रमाणित केलंय, त्यांनाही तुम्ही मंत्रिमंडळात स्थान दिलंय. तुम्हाला केवळ धर्माच्या नावावर ध्रुवीकरण करायचं आहे, हे अत्यंत लाजीरवाणं आहे, असे म्हणत पृथ्वीराज चव्हाण यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलं.
मलिकांच्या भूमिकेवर अजित पवार काय म्हणाले?
देवेंद्र फडणवीसांच्या पत्राबद्दल बोलताना अजित पवार म्हणाले की, "देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेलं पत्र मला मिळालं असून मी ते पत्र वाचलं आहे. २ जुलैला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महायुतीला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली. या सर्व घडामोडीनंतर नवाब मलिक हे कालच पहिल्यांदा सभागृहात आले आणि ते कुठे बसले हे सर्वांना माहीत आहे. मात्र त्यांनी स्पष्टपणे या सगळ्या घडामोडींबाबत भूमिका मांडलेली नाही. मलिक यांनी आपली भूमिका मांडल्यानंतर मी कालच्या पत्राबद्दल भूमिका मांडणार आहे," असं अजित पवारांनी म्हटलं आहे. यासंदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नावर बोलताना अजित पवार काहीसे चिडलेले पाहायला मिळाले.
... तर खरा पिक्चर सुरू होईल
अपक्ष आमदार आणि मंत्री बच्चू कडू यांनी नवाब मलिक प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. पत्रकारांनी सरकारमध्ये अलबेल आहे का?, असा सवाल बच्चू कडू यांना विचारला. यावर सरकारमध्ये सर्वकाही अलबेल आहे. मात्र, शेतकरी, मजूर, शाळा, कॉलेज, हॉस्पिटल हे पाहिजे तशे चांगले नाहीय, त्यामुळे लक्ष घालण्याची गरज असल्याचे बच्चू कडूंनी म्हटले. तसेच नवाब मलिकांवर प्रश्न विचारल्यास देवेंद्र फडणवीसांनी पत्र लिहिल्यानंतर नवाब मलिकांची भूमिका महत्वाची आहे. उद्या जर नवाब मलिक म्हणाले, की मला अजित पवारांसोबतच जायचे आहे. तेव्हा खरी मजा येईल, असं बच्चू कडू म्हणाले. तसेच नवाब मलिकांना अजितदादांनी नकार दिल्यानंतर खरा पिक्चर सुरु होईल, असा दावाही बच्चू कडूंनी केला आहे.