मुंबई - साहेब घाईघाईत तिकीट काढायचे राहून गेले, आता रोख पैसेही नाहीत, असे सांगत दंडाची रक्कम भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या प्रवाशांना आता कारणे सांगायची सोयही राहणार नाही. कारण आता तिकीट तपासणीसांकडे (टीसी) दंडाची रक्कम यूपीआय वा क्यूआर कोड सिस्टीमद्वारे ऑनलाइन भरता येणार आहे; तसेच टीसीशी हुज्जत घालणाऱ्या प्रसंगी त्यांना मारहाण करणाऱ्या प्रवाशांचे चित्रीकरणही होणार आहे.
लोकल, मेल-एक्स्प्रेसने प्रवास करताना अनेकदा प्रवासी विनातिकीट प्रवास करतात, सेकंड क्लासच्या पासवर फर्स्ट क्लास, एसी लोकलमध्ये चढतात, अशा प्रवाशांवर टीसीद्वारे दंडात्मक कारवाई करण्यात येते; परंतु अनेकदा या कारवाईदरम्यान प्रवासी टीसीशी वाद, हुज्जत घालतात. बऱ्याचदा या वादावादीचे रूपांतर मोठ्या भांडणात होते. कधी-कधी रागात प्रवासी टीसीला मारहाणही करतात. अशा घटनांना आळा घालण्यासाठी बॉडी कॅमेरा दिला आहे.
तक्रारीची चाैकशीबॉडी कॅमेरामुळे तिकीट तपासणीदरम्यान पारदर्शकता राखण्यास आणि गैरवर्तन वा हिंसक कृत्ये रोखण्यास मदत होणार आहे. या कॅमेरामुळे तिकीट तपासणीदरम्यान कोणतीही तफावत आढळून आल्यास किंवा प्रवासी-टीसीसंदर्भात तक्रारी आल्यास रेल्वेला चौकशी करण्यास मदत होणार आहे.
सुरळीत आणि पारदर्शक तिकीट तपासणी सुनिश्चित करण्यासाठी तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांसाठी बॉडी कॅमेऱ्यांसह एसबीआय योनो ॲपद्वारे प्रवाशांकडून पेमेंट स्वीकारण्यासाठी यूपीआय, क्युआर कोड पेमेंट सिस्टीम सुरू करून नवीन तिकीट तपासणी उपक्रम सुरू केले. यामुळे तिकीट तपासणीस कर्मचाऱ्यांना मोठी मदत होणार आहे.- रजनीश गोयल, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, मध्य रेल्वे, मुंबई विभाग