"गुवाहटी पाहुणचाराच्या बदल्यात भीमाशंकर ज्योतिर्लिंग तर आसामला दिलं नाही ना?"
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2023 01:30 PM2023-02-15T13:30:10+5:302023-02-15T13:38:26+5:30
देशात असलेल्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्रात ४ ज्योतिर्लिंग आहेत, त्यापैकी एक पुण्यात.
मुंबई - राज्यातील सत्तातरात सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली. शिवसेनेच्या ४० आमदारांना घेऊन ते गुवाहटीला गेले होते. त्यानंतर, राज्यात सत्तांतर झालं अन् महाविकास आघाडी सरकार कोसळलं. यावेळी, एकनाथ शिंदेंनी आमदारांना दिलासा देत आपल्या पाठिशी अदृश्य शक्ती असल्याचं म्हटलं होतं. त्यावरुनच, आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी युती सरकारला प्रश्न विचारला आहे. गुवाहटीत आसामच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या पाहुणचाऱाच्या बदल्यात त्यांना पुण्यातील भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग तर दिल नाही ना? असा सवाल सुळे यांनी केला आहे.
देशात असलेल्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात एक आहे. मात्र, पुण्यातील हेच भीमाशंकर ज्योतिर्लिंग आसाम सरकारने आसाममध्ये असल्याचा जावई शोध लावलाय. त्यावरुन, आता आसाम सरकारविरुद्ध महाराष्ट्रातून रोष व्यक्त होत आहे. त्यामध्ये, महाविकास आघाडीते नेते आघाडीवर आहेत. भीमाशंकरचं सहावं ज्योतिर्लिंग हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात नसून आसाममध्ये असल्याचा दावा आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा यांनी केला आहे. विशेष म्हणजे आसाम पर्यटन विभागानेही याची जाहिरात केली आहे. याविरोधात आता महाराष्ट्रातील विरोधकांनी आसाम सरकारच्या दाव्यावर जोरदार टीका केली आहे.
घटनाबाह्य ED सरकार-आपण गुवाहाटीला आमदारांची फौज पळवून नेली होती.तिथं तुमची सर्व सोय अदृश्य शक्तीच्या वतीने आसामच्या मुख्यमंत्र्यांनी केली होती.त्याचवेळी तुम्ही बदल्यात हे भीमाशंकर ज्योतिर्लिंग तर देऊन आला नाहीत ना?अर्थात अशी शक्यता नाकारता येत नाही.@mieknathshinde@Dev_Fadnavis
— Supriya Sule (@supriya_sule) February 14, 2023
आसाम सरकारच्या या दाव्यावर चौफेर टीका होत असून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गुवाहटी दौऱ्याचा संदर्भ देत शिंदे-फडणवीस सरकारला लक्ष्य केलं आहे. ''घटनाबाह्य ED सरकार-आपण गुवाहाटीला आमदारांची फौज पळवून नेली होती. तिथं तुमची सर्व सोय अदृश्य शक्तीच्या वतीने आसामच्या मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्याचवेळी तुम्ही, बदल्यात हे भीमाशंकर ज्योतिर्लिंग तर देऊन आला नाहीत ना? अर्थात अशी शक्यता नाकारता येत नाही, अशी खोचक टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
काय आहे प्रकरण
महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर आसाम सरकारच्या पर्यटन विभागाकडून संकेतस्थळावर एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये "भारतातील सहावे ज्योतिर्लिंग असलेल्या, कामरुप डाकिनी पर्वत, आसाममध्ये आपलं स्वागत आहे", असा आशय असणारी जाहिरात आहे. त्यामध्ये, विविध ज्योतिर्लिंग स्थळांची यादी देखील देण्यात आली आहे. यात भीमाशंकरच्या नावापुढे स्थळाचा उल्लेख 'डाकिनी'मधील भीमाशंकर असा करण्यात आला आहे. या जाहिरातीमध्ये मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा यांचा फोटोही आहे.