मुंबई : देशात कोरोनाचे संकट आल्यापासून सर्वच घटकांवर अनिष्ट परिणाम झाले आहेत. त्यातच इंधनाचे दर वाढत आहेत. वर्षात डिझेल ३० टक्क्यांनी महागले असल्याने भाडेवाढीने किराणा मालाचेही दर वाढले आहेत. मुंबईत किराणा जवळपास १५ टक्क्यांनी वाढल्याने गृहिणींचे बजेट आणखी कोलमडले आहे.
मागील वर्षभरापासून कोरोनाचे संकट सुरू आहे. यामुळे अनेकांचे काम गेले आहे. तसेच छोटे व्यवसायही बंद पडले आहेत, तर दुसरीकडे इंधनाचे दर सतत वाढत चालले आहेत. यामुळे वाहतूक खर्च वाढतच चालला आहे. परिणामी महागाईने नवीन उच्चांक गाठला आहे. सर्वसामान्यांना तर जगणे मुश्कील झालेले आहे.
डिझेलच्या वाढलेल्या दराचा थेट परिणाम मालवाहतूक दरवाढीवर झालेला आहे. परिणामी, किराणा साहित्याचे दरही वधारले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून किराणा वस्तूंच्या किमती १० ते १५ टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्यातच कडक निर्बंधांच्या काळात नफेखोरीच्या प्रकारालाही उधाण आले असून, सर्वसामान्य ग्राहक पुरता हैराण झाला आहे.
--
काय म्हणतात गृहिणी...
कोरोना संसर्गाच्या संकटाने भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे. दुसरीकडे स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचे दर वाढले असतानाच खाद्यतेलाच्या वाढत्या किमतीने सर्वसामान्य त्रस्त झाले आहेत. किराणा मालाच्या सर्वच वस्तूंचे दर वाढत असल्याने मासिक बजेट कोलमडले आहे.
- गौरी म्हात्रे
---
कोरोना संसर्गाच्या संकटामुळे व्यवसाय पूर्णत: बंद ठेवावा लागत आहे. यामुळे घरातील कर्ते पुरुष हैराण झाले आहेत. आवकच बंद झाल्याने पैशांची चणचण भासत आहे. अशा स्थितीत किराणा वस्तूंचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्याने जगणे मुश्कील झाले आहे.
- अनिता बनसोडे
---
डिझेलच्या दरात वाढ झाल्याचे कारण समोर करून वाहतूकदारांनी त्यांचे दर वाढविले आहेत. यामुळे किराणा वस्तूंच्या दरात गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने वाढ होत आहे. मुंबईत किरणामालाच्या दरात १५ टक्के वाढ झाली आहे.
- वीरेन शाह, अध्यक्ष, फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स असोसिएशन
--
किराणा दर - मार्च २०२० -सप्टेंबर २०२०- मे २०२१
तूरडाळ- ९० -९५- १००
हरभरा डाळ - ६५ ६८ ७०
साखर -४० ३८ ४०
तांदूळ ४० -४५ ५५
गूळ ३८ ४० ४०
बेसन ६८ ७० ८०
...............
तेलाचे दरही दुपटीने वाढले (दर प्रतिकिलो)
सूर्यफूल १२० १६७ १७०
सोयाबीन १०५ ११५ १५५
पामतेल १०० ११० १४०
शेंगदाणा १४५ १७२ १८०
.................
डिझेल दराचा भाव प्रतिलीटर
जानेवारी २०२० - ६६.२१
जून २०२० - ७८.८३
जानेवारी २०२१ - ८३.२८
मे २०२१ -९०. ४०
.................