Join us  

पारंपरिक आगमनाने डीजेला चोख प्रत्युत्तर

By admin | Published: August 11, 2016 4:17 AM

मुंबईतील ‘पहिले पारंपरिक आगमन’ म्हणून प्रसिद्धी मिळालेल्या ‘काळाचौकीचा महागणपती’ने आपले वेगळेपण यंदाही कायम ठेवण्याचा निश्चय केला आहे.

चेतन ननावरे, मुंबईमुंबईतील ‘पहिले पारंपरिक आगमन’ म्हणून प्रसिद्धी मिळालेल्या ‘काळाचौकीचा महागणपती’ने आपले वेगळेपण यंदाही कायम ठेवण्याचा निश्चय केला आहे. डीजेच्या धिंगाण्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी या वेळीही काळाचौकी विभाग सार्वजनिक उत्सव मंडळाने १४ आॅगस्ट रोजी पारंपरिक पद्धतीचा आगमन सोहळा आयोजित केला आहे.‘काळाचौकीचा महागणपती’च्या आगमन सोहळ्यात राज्यातील विविध परंपरांचे दर्शन एकाच ठिकाणी घडेल, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष नितीन केरकर यांनी दिली. केरकर म्हणाले की, यंदाचे खास आकर्षण म्हणून सुमारे २०० वारकरी या सोहळ्यामध्ये सामील होणार आहेत. टाळ, मृदुंगाच्या तालावर वारकरी संप्रदायाच्या संस्कृतीचे दर्शन ते या वेळी घडवतील. वारकऱ्यांसोबत महागणपतीच्या स्वागतासाठी नऊवारी साडी नेसून महिलाही सामील होतील. कोकणामधील होळीला पालखी नाचविणे हा नयनरम्य देखावाही ‘याचि देही याचि डोळा’ आगमन सोहळ्यात पाहता येईल. गणेशभक्तांना आगमन सोहळ्यात सांस्कृतिक मेजवानीसोबत पारंपरिक मर्दानी खेळांची मेजवानीही मिळेल, असे मंडळाचे प्रमुख कार्यवाह अमन दळवी यांनी सांगितले. दळवी म्हणाले की, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी गौरविलेले शिवगर्जना मर्दानी तालीम हे पथक तलवारबाजीचे व दांडपट्ट्याचे कसब आगमन सोहळ्यादरम्यान दाखवतील. शिवाय मुंबईचे मूळ रहिवासी असलेल्या वरळी कोळीवाड्यातील कोळी बंधू आणि भगिनी पारंपरिक पोशाखात सोहळ्यात सामील होणार आहेत.