चेतन ननावरे मुंबई : शहरात डिझेलच्या दराने ऐतिहासिक उच्चांक गाठला असून आतापर्यंतच्या सर्वाधिक दराची नोंद मंगळवारी झाली. मुंबईकरांना मंगळवारी प्रति लीटर डिझेलसाठी ६७ रुपये ३० पैसे मोजावे लागले. या ऐतिहासिक दरवाढीमुळे सर्वसामान्य व जीवनावश्यक वस्तूंचे दरही वाढणार असताना, विरोधक मात्र या मुद्द्यावर मूग गिळून गप्प असल्याचे दिसत आहे.इंधनाच्या रोज बदलणाºया दरांमुळे गेल्या दोन महिन्यांपासून सातत्याने होणारी दरवाढ सर्वसामान्यांच्या लक्षात आली नाही. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर घसरले असतानाही वाढवलेल्या कराच्या बोजामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावण्याचे काम सरकारकडून सुरू आहे. पेट्रोलच्या तुलनेत डिझेलच्या दरात वाढ झाल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतूक खर्चात वाढ होणार आहे. परिणामी, महागाईतही वाढ होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.धक्कादायक बाब म्हणजे याच इंधन दरवाढीचे भांडवल करून भारतीय जनता पार्टीचे सरकार सत्तेवर आले होते. बैलगाडी मोर्चा आणि विविध आंदोलने करून भाजपा नेत्यांनी विरोधात असताना दरवाढीचा निषेध केला होता. मात्र आज डिझेलच्या दराने उच्चांक गाठला असताना एकही राजकीय पक्ष सर्वसामान्यांसाठी रस्त्यावर उतरल्याचे दिसत नाही. त्यामुळे महागाईत होरपळणाºया सर्वसामान्य जनतेने ‘अच्छे दिन’ची स्वप्ने कुणाच्या जिवावर पाहायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे.याआधी युतीचे सरकार असताना शिवसेनेने जीवनावश्यक वस्तूंचे दर स्थिर ठेवले होते. त्यामुळे इंधन दरवाढीचा थेट फटका सर्वसामान्यांना बसला नव्हता. त्यामुळे किमान इंधन दरवाढ नियंत्रणात ठेवता येत नसेल, तर सरकारने जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीवर अनुदान देण्याची गरज आहे.- खासदार अरविंद सावंत, शिवसेना प्रवक्ते‘अच्छे दिन’च्या घोषणा देत सरकारने सर्वसामान्यांची फसवणूक केल्याचे नागरिकांच्या लक्षात आले आहे. काँग्रेस सरकारच्या काळात कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल १०० डॉलरहून अधिक असतानाही इंधन दर नियंत्रणात होते. याउलट युती सरकारच्या हे दर ७० डॉलरहून कमी असूनही अधिक कर लादल्याने इंधनाच्या किमती वाढल्या आहेत. पेट्रोल व डिझेलचा समावेश वस्तू व सेवा करात (जीएसटी) करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. प्रजासत्ताक दिनानंतर या प्रश्नावर आंदोलन करू.- संजय निरुपम, अध्यक्ष, मुंबई काँग्रेस‘सळो की पळो’ करून सोडणार!निवडणुकांआधी घोषणाबाजी करण्यासाठी सरकार सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावून महसूल गोळा करत आहे. आर्थिक दिवाळखोरीकडे निघालेले सरकार बड्या कॉर्पोरेट्सची कर्जे पुनर्गठीत करून सर्वसामान्यांवर कराचा बोझा वाढवत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने याआधीही महागाईविरोधात आंदोलन केली आहे. येत्या दोन दिवसांत प्रतिकात्मक आंदोलन करणार असून प्रजासत्ताक दिनानंतर राष्ट्रवादी इंधन दरवाढीविरोधात रस्त्यावर उतरून सरकारला ‘सळो की पळो’ करून सोडेल.- सचिन अहिर, अध्यक्ष-मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस
डिझेल ऐतिहासिक उच्चांकावर : महागाई वाढण्याची चिन्हे , विरोधक थंडच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 2:55 AM