Join us

डिझेलच्या दरवाढीचा एसटी महामंडळाला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2021 4:07 AM

डिझेल दरवाढीचा एसटी महामंडळाला फटकादररोज एक कोटी रुपयांचा तोटालोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनामुळे एसटीला माेठा आर्थिक ...

डिझेल दरवाढीचा एसटी महामंडळाला फटका

दररोज एक कोटी रुपयांचा तोटा

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनामुळे एसटीला माेठा आर्थिक फटका सहन करावा लागला. आता काेराेना संसर्ग नियंत्रणात आल्याने हळूहळू प्रवासी वाहतूक सुधारत असली तरी डिझेल दरवाढीमुळे एसटीला दररोज एक कोटीचा तोटा सहन करावा लागत आहे. गेल्यावर्षी एसटीतील वाहनांची संख्या जास्त होती, तर दैनंदिन १२ लाख लिटर डिझेलचा वापर केला जात होता. मात्र, यावर्षी वाहनांची संख्या कमी आणि दैनंदिन ९ लाख लिटर डिझेल लागत असताना, इंधन दरवाढीमुळे एसटीच्या डिझेल खर्चात वाढ झाल्याने महामंडळाला आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.

गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात एसटी महामंडळाला मिळणाऱ्या डिझेलचे दर ६६ रुपये लिटर होते. त्या तुलनेत यावर्षी फेब्रुवारीत डिझेलचे दर ७९ रुपये लिटर आहे. यामध्ये तब्बल १३ रुपयांची दरवाढ झाली असून, त्याचा परिणाम एसटी महामंडळावर झाल्याचे चित्र आहे. एसटीला दिवसाला एक कोटींचा, तर महिनाभरात तब्बल ३० कोटींचा तोटा सहन करावा लागत आहे. एसटी महामंडळाने दि. ९ जानेवारी रोजी सततच्या इंधन दरवाढीमुळे मालवाहतुकीची भाडेवाढ जाहीर केली होती.

* प्रवासी भाडेवाढीबाबत निर्णय नाही

दरवाढीपूर्वी ३८ रुपये प्रति किलोमीटर रुपये दर घेतले जात होते. इंधन दरवाढीमुळे त्यामध्ये ४ रुपयांची वाढ करून ४२ रुपये प्रति किलोमीटर दर सध्या मालवाहतुकीसाठी आकारले जात आहेत. त्यामुळे भविष्यात प्रवासी वाहतुकीचे भाडेही वाढण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. मात्र, इंधन दरवाढीचा परिणाम महामंडळावर झाला असला तरी प्रवासी भाडेवाढीसंदर्भात अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याचे एसटी महामंडळाचे मुख्य जनसंपर्क अधिकारी राजन शेलार यांनी सांगितले.

......................................