डिझेलचोर पोलिसांच्या ताब्यात
By admin | Published: May 9, 2016 03:42 AM2016-05-09T03:42:54+5:302016-05-09T03:42:54+5:30
रस्त्यालगत उभ्या असलेल्या टँकरमधून डिझेलची चोरी करणाऱ्या दोघांना रविवारी रेशन अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडून वडाळा पोलिसांच्या ताब्यात दिले.
मुंबई : रस्त्यालगत उभ्या असलेल्या टँकरमधून डिझेलची चोरी करणाऱ्या दोघांना रविवारी रेशन अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडून वडाळा पोलिसांच्या ताब्यात दिले. गेल्या अनेक महिन्यांपासून या परिसरात डिझेलची चोरी होत असल्याची माहिती या अधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. यामध्ये आणखी काही आरोपींचा समावेश असून, पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
गेल्या अनेक महिन्यांपासून शिवडी परिसरात डिझेलचोरीचे प्रकार होत होते. रेशनिंग अधिकाऱ्यांना ही माहिती मिळताच त्यांनी शनिवारी पहाटे काही टँकरचा नवी मुंबईपासूनच पाठलाग सुरू केला. हे टँकर वडाळ्यात येताच तेलमाफियांनी टँकरचे सील तोडून त्यातील शेकडो लीटर डिझेल काढून घेतले.
रेशन अधिकाऱ्यांनी ही माहिती वडाळा पोलिसांना देऊन या ठिकाणी छापा घातला. टँकरचालक
आणि तेलमाफियांनी घटनास्थळावरून पळ काढला. मात्र यामध्ये पोलिसांनी उत्तीलाल सरोज (२०) आणि सुरेंद्र यादव (४०) या दोघांचा पाठलाग करून अटक केली. तसेच पोलिसांनी यामध्ये चार टँकरदेखील ताब्यात घेतले आहेत. चोरलेले डिझेलदेखील पोलिसांनी हस्तगत केले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी अशा प्रकारे चोरी होत असल्याची माहिती एका रहिवाशाने दिली. याची कल्पना संबंधित पेट्रोल कंपन्यांमधील अधिकारी आणि पोलिसांनादेखील आहे, असे त्यांने सांगितले.
या गुन्ह्यामध्येदेखील अनेक मोठ्या माफियांचा सहभाग असण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलीस कशा प्रकारे कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. (प्रतिनिधी)