कोरोना नियमांचे पालन न करण्याऱ्या रेस्टॉरंटवर आहारची नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:07 AM2021-03-17T04:07:10+5:302021-03-17T04:07:10+5:30
दहा विभागात पथके पाहणी करणार लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने केलेल्या आवाहनानुसार कोरोना नियमांचे पालन ...
दहा विभागात पथके पाहणी करणार
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने केलेल्या आवाहनानुसार कोरोना नियमांचे पालन न करण्याऱ्या रेस्टॉरंटवर नजर ठेवण्यासाठी आहारने ४ जणांचे एक अशी दहा पथके तयार केली आहेत. ही पथके नियम न पाळणाऱ्या रेस्टॉरंटवर लक्ष ठेवणार आहेत.
आहारचे अध्यक्ष शिवानंद शेट्टी म्हणाले की, कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता मुख्यमंत्र्यांनी चिंता व्यक्त केली आहे. राज्य सरकारने उभारलेल्या कोरोनाविरोधी लढ्याला आमचा पाठिंबा आहे. आम्ही आमच्या संघटनेचे पथके स्थापन केली आहेत आणि आमच्या रेस्टॉरंटमध्ये इंडस्ट्री एसओपींचे पूर्णपणे पालन व्हावे यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू. उद्योगाला दुसऱ्यांदा लॉकडाऊन करणे परवडणार नाही. जर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे उल्लंघन करत असेल तर त्याला पहिल्यांदा पथक ताकीद देईल. ताकीद देऊनही एखाद्या रेस्टॉरंटने नियमांचे उल्लंघन केले तर त्याची पालिकेकडे तक्रार केली जाईल.
शेट्टी पुढे म्हणाले की, आहारने मुंबईत १० झोननुसार दहा पथके केली आहेत. प्रत्येक झोनचे नेतृत्व हे आहारचे उपाध्यक्ष करणार आहेत.
पथकातील सदस्यांना कोरोना नियमावली आणि त्याची अंमलबजावणी कशी करावी याची माहिती देण्यात आली आहे. वारंवार विनंती केल्यानंतर कोणतेही सदस्य रेस्टॉरंट नियमावलीचे उल्लंघन करत असल्याचे आढळल्यास त्यांना संबंधित सरकारी अधिकाऱ्यांना अहवाल देण्याचा अधिकार आहे.
गेल्यावर्षी या उद्योगाला सात महिन्यांहून अधिक काळ चाललेल्या लॉकडाऊनचा मोठा फटका बसला. ज्यामुळे अनेक रेस्टॉरंट्स कायमची बंद झाली. त्यामुळे काळाची गरज एकत्र येऊन लॉकडाऊन होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन शेट्टी यांनी रेस्टॉरंट चालकांना केले आहे.