मुलांना शिकवणार ‘चांगला-वाईट’ स्पर्शातील फरक
By admin | Published: December 14, 2015 01:40 AM2015-12-14T01:40:55+5:302015-12-14T01:40:55+5:30
लहान मुलांना घडणाऱ्या गोष्टींचा अर्थबोध अनेकदा होत नाही. पालकही मूल लहान आहे असा विचार करून त्यांना काही गोष्टी सांगण्याचे टाळतात
मुंबई: लहान मुलांना घडणाऱ्या गोष्टींचा अर्थबोध अनेकदा होत नाही. पालकही मूल लहान आहे असा विचार करून त्यांना काही गोष्टी सांगण्याचे टाळतात; पण याचाच गैरफायदा घेऊन विकृत मनोवृत्तीच्या व्यक्ती लहान मुलांचे लैंगिक शोषण करतात. लहान मुलांच्या लैंगिक शोषणाचे प्रकार वाढले आहेत. असे प्रकार टाळण्यासाठी लहान मुलांना वाईट आणि चांगल्या स्पर्शाची माहिती ‘वी केअर’ या उपक्रमांतर्गत देण्यात येणार आहे.
महाराष्ट्र असोसिएशन आॅफ रेसिडंट डॉक्टरर्स (मार्ड) यांनी डॉक्टर आणि रुग्णांचे नातेसंबंध सुधारण्यासाठी ‘वी केअर’ ही मोहीम हाती घेतलेली आहे. या मोहिमेंतर्गत पुढचे चार महिने विविध विषय घेऊन जनजागृती करण्यात येणार आहे. यात मोहिमेत पहिला विषय हा ‘मुलांचे लैंगिक शोषण’ हा घेण्यात आलेला आहे. या मोहिमेत मुले आणि पालक अशा दोन पातळ््यांवर जनजागृती केली जाणार आहे. ३ ते १० वयोगटातील पाल्यांच्या पालकांशी आणि ५ ते १० वयोगटातील पालकांशी या मोहिमेत संवाद साधला जाणार असल्याचे मार्डचे अध्यक्ष डॉ. सागर मुंदडा यांनी सांगितले.
लहान मुलांना अनोखळी व्यक्तीशी बोलू नका, त्यांनी दिलेला खाऊ घेऊ नका, असे शिकवले जाते. पण ओळखीच्या व्यक्तींशी बोलताना, त्यांच्याबरोबर बाहेर जाताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, हे सांगितले जात नाही; पण सध्या याची गरज आहे. म्हणूनच ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. पाल्याने एखादी तक्रार केल्यास पालकांनी त्याकडे दुर्लक्ष करू नये. त्या तक्रारीच्या मुळापर्यंत जाऊन कारण शोधले पाहिजे. तीन वर्षांच्या मुलामुलींना गुप्तांगाला कोणालाही स्पर्श करून द्यायचा नाही, असे पालकांनी मुलांना शिकवले पाहिजे. एखाद्या व्यक्तीबरोबर बाहेर जाण्यासाठी मुलांना भरीस पाडू नये, मुलींना कोणाच्याही मांडीवर बसायला देऊ नये. मुले दोन वर्षांची झाली की कोणाही समोर त्यांना कपडे घालू अथवा त्यांचे कपडे काढू नयेत, असे डॉ. मुंदडा यांनी सांगितले.