गोखले आणि बर्फीवाला पुलांच्या उंचीत तफावत; तांत्रिक दोष नसल्याची सारवासारव

By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2024 10:47 AM2024-02-29T10:47:51+5:302024-02-29T10:49:04+5:30

अंधेरीतील गोखले पुलाची उंची सुमारे पावणेदोन मीटरने वाढली आहे. त्यामुळे एमएसआरडीसीने जुहू ते अंधेरीदरम्यान बांधलेल्या पुलाला जोडणे आता अशक्य झाले आहे.

difference in height of gokhale and barfiwala bridges absence of technical defects | गोखले आणि बर्फीवाला पुलांच्या उंचीत तफावत; तांत्रिक दोष नसल्याची सारवासारव

गोखले आणि बर्फीवाला पुलांच्या उंचीत तफावत; तांत्रिक दोष नसल्याची सारवासारव

मुंबई : अंधेरीतील गोखले पुलाची उंची सुमारे पावणेदोन मीटरने वाढली आहे. त्यामुळे एमएसआरडीसीने जुहू ते अंधेरीदरम्यान बांधलेल्या पुलाला जोडणे आता अशक्य झाले आहे. त्यामुळे गोखले पुलाच्या शेजारी तातडीने रॅम्प उभारण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. पालिकेच्या या ढिसाळ नियोजनामुळे स्थानिकांना गोखले पुलाची एक मार्गिका सुरू होऊनही वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागणार आहे. 

गोखले पूल वाहतुकीसाठी धोकादायक झाल्याने ७ नोव्हेंबर २०२२ रोजी वाहतुकीसाठी पूर्णतः बंद करण्यात आला. त्यानंतर पश्चिम रेल्वे व महापालिकेने समन्वय साधत १ एप्रिल २०२३ पासून गोखले पुलाचे काम सुरू केले. रविवार, २५ फेब्रुवारी रोजी गोखले पुलाची एक मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्यात आली. मात्र, गोखले पुलाची उंची दीड ते पावणेदोन मीटरने वाढ झाल्याने पालिकेसाठी मोठे आव्हान उभे ठाकले आहे. उड्डाण पुलाचे बांधकाम सुरू असताना रेल्वे विभागामार्फत नवीन धोरण जाहीर करण्यात आले.  यापुढे पुलाच्या बांधकामात कोणताही दोष उद्भवू नये यासाठी महानगरपालिका कटिबद्ध आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर तातडीने रॅम्प उभारला जाईल, तसेच डिसेंबरअखेरपर्यंत उड्डाण पुलाच्या उर्वरित तीन मार्गिकांचे कामही युद्ध पातळीवर पूर्ण करू, असे आश्वासन पालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी  दिले आहे.

पालिका प्रशासनाचे नियोजनाकडे असलेले दुर्लक्ष या महत्त्वाच्या २ पुलांमधील अंतराला कारणीभूत आहे. एखादा प्रकल्प हाती घेतल्यानंतर त्यांच्या नियोजन आणि अंमलबजावणीत अशा चुका होणे ही गंभीर गोष्ट असल्याने या अधिकारी आणि कंत्राटदारांवर कारवाई व्हावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.

Web Title: difference in height of gokhale and barfiwala bridges absence of technical defects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.