मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपाची चर्चा महाविकास आघाडीतील तीन पक्ष लवकरच करतील, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जाहीर केले असतानाच शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मुखपत्रात शरद पवार यांच्यावर झालेली टीका आणि एकमेकांचे नेते पळविण्यावरून धुसफूसही सुरू झाली आहे.
शरद पवारांना पक्ष पुढे नेण्यासाठी नेतृत्व निर्माण करण्यात त्यांना अपयश आले आहे, अशी टिप्पणी मुखपत्रातून करण्यात आली. त्यावरून खा. संजय राऊत यांना राष्ट्रवादीने लक्ष्य केले. शरद पवार यांनी यावर, पूर्ण माहिती घेवून लिहिणे योग्य राही. महाविकास आघाडी टिकावी ही त्यांचीही (संजय राऊत) भूमिका असावी याची मला खात्री आहे, अशी प्रतिक्रिया दिली.
ठाकरे गट अन् काँग्रेसमध्ये वारप्रतिवार
एकमेकांचे नेते पळविण्यावरूनही महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडली आहे. महाडच्या माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप यांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.
स्नेहल जगताप यांना पक्षात घेवू नका, असे मी उद्धव ठाकरे यांना सांगितले होते पण त्यांनी ऐकले नाही. काँग्रेसला कमजोर करण्याचे असे काम योग्य नाही, असे पटोले म्हणाले.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पटोलेंवर पलटवार केला. जगताप यांनी उद्धवजींच्या नेतृत्वात काम करण्याची इच्छा होती, त्यांना नाही कसे म्हणणार असा सवाल त्यांनी केला.
बॅगांवर लक्ष ठेवायचे होते...
राष्ट्रवादीवर बारकाईने लक्ष ठेवण्यापेक्षा संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या बॅगांवर लक्ष ठेवले असते तर आज सत्तेच्या बाहेर बसावे लागले नसते, असा टोला छगन भुजबळ यांनी लगावला आहे.
...तर आमदार गेले नसते !
मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, राष्ट्रवादी फोडण्याचा भाजपचा डाव होता हे संजय राऊत सांगतात. इतरत्र लुडबूड करण्यापेक्षा स्वत:च्या पक्षाकडे लक्ष दिले असते तर आमदार गेले नसते. आता त्यांनी राजकारण सोडलेले बरे.
सोलापूरबाबत सस्पेन्स कायम
सोलापुरात राष्ट्रवादीने काँग्रेस व इतर पक्षातील लोकांना प्रवेश देणे सुरू केल्याने लोकसभेच्या जागेवर राष्ट्रवादी दावा करणार असल्याच्या चर्चेनेही उचल घेतली. ही जागा मागण्याची चर्चा आता नको, असे सांगत शरद पवार यांनी या चर्चेवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला तरी सस्पेन्स मात्र कायम ठेवला आहे. नाना पटोले यांनी सोलापूरच्या विकासात काँग्रेसचे योगदान आहे. ही जागा काँग्रेसचीच आहे. इथे काँग्रेसचाच उमेदवार असेल, असे ठासून सांगितले आहे. ही जागा पुन्हा काँग्रेसच लढेल असे त्यांनी पंढरपुरात स्पष्ट केले.