वेगळ्या वाटेवरील करिअरच्या संधी

By admin | Published: June 30, 2017 03:11 AM2017-06-30T03:11:50+5:302017-06-30T03:11:50+5:30

स्वत:च्या आवडीचा विषय निवडा, अगदी मनापासून झोकून द्या, मग यश हे आपलेच आहे. लहानपणी, शालेय शिक्षण घेत असताना,

Different career opportunities | वेगळ्या वाटेवरील करिअरच्या संधी

वेगळ्या वाटेवरील करिअरच्या संधी

Next

स्वत:च्या आवडीचा विषय निवडा, अगदी मनापासून झोकून द्या, मग यश हे आपलेच आहे. लहानपणी, शालेय शिक्षण घेत असताना, वर्गशिक्षक, चित्रकला शिक्षक, संगीतातले शिक्षक, क्रीडाशिक्षक असे अनेक शिक्षक विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबर इतरही विविध गोष्टींचे ज्ञान देत असतात. आठवड्याभरात एखादा ५० मिनिटांचा तास विद्यार्थ्यांना एका आवडीच्या विषयासाठी मिळतो. तेव्हाच ज्या विद्यार्थ्याला एखाद्या विशिष्ट विषयाची गोडी लागते, तो विद्यार्थी कधी सुंदर चित्रे काढू लागतो, कधी शाळेच्या हस्तलिखितात लेख किंवा कविता लिहू लागतो. शाळेतील ८वी ते १०वीपर्यंत विद्यार्थी खरोखरच काम करू शकेल याचा अंदाज त्यांना स्वत:ला, त्याच्या पालकांना तसेच त्यांच्या शिक्षकांनादेखील येऊ शकतो.
अशा वेळी विद्यार्थ्यांना शालेय कार्यक्रमातून जास्तीत जास्त सहभाग घेण्याची संधी मिळते. त्याचे शिक्षक ही संधी त्याला मिळवून देतात. येथेच विद्यार्थ्यांच्या पुढील जीवनाची सुरुवात होत असते. शालेय किंवा महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्याला एखाद्या संस्कार शिबिरात क्रिकेट शिकायला मिळते किंवा व्यासपीठावर उभे राहून आपले विचार मांडण्याची संधी मिळते. गेल्या काही वर्षांपासून वेगवेगळ्या क्षेत्रांत करिअर करण्यासाठी वेगवेगळे कोर्सेस चालू झाले आहेत. अशा वेळी पुढील अभ्यासक्रमातील कोणता अभ्यासक्र म निवडावा, असा प्रश्न विद्यार्थी व पालकांनाही पडतो. इंटरनेटवरदेखील ही सर्व माहिती उपलब्ध असते. परंतु त्यातील कोणता कोर्स निवडावा, हा खरा प्रश्न पडतो. महत्त्वाचे काय तर विद्यार्थी, त्याची आवड, त्याला अभ्यास झेपेल किंवा नाही याबाबतीत समज व कुठल्याही परिस्थितीत निवड केलेल्या विषयात १०० टक्के योगदान देण्याची तयारी असू द्यात. कुठल्याही विषयात करिअर करायचे झाल्यास फक्त कॉलेजातील ६ ते ८ तासांचा अभ्यास अपुरा पडतो. त्यानंतरही लायब्ररीत थांबून नोट्स काढणे किंवा इंटरनेटवरील रेफरन्सेस बघणे या गोष्टी विद्यार्थ्याला मनापासून कराव्या लागतात. या सर्व गोष्टींसाठी घरातील पोषक वातावरणदेखील महत्त्वाचे असते. शाळेनंतरचा, कॉलेजमधील हा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर योग्य जागी, योग्य कंपनीत नोकरी मिळणे किंवा एखादा छोटासा उद्योग चालू करण्यासाठीदेखील हे संस्कार महत्त्वाचे असतात.
मोठ्या-मोठ्या उद्योग समूहात सर्व प्रकारचे काम उपलब्ध असते. वर्षानुवर्षे नवीन वस्तू बाजारात येतच राहतात व त्यासाठी सर्व तऱ्हेच्या माणसांची, स्किल्ड वर्कर्सची गरज लागतेच. मार्केट रिसर्च, मार्केटिंग, मॅन्युफॅक्चरिंग, इंजिनीअर्स, अकाउंट्स अशा प्रकारच्या तज्ज्ञ व कार्यक्षम व्यक्तींची आज इंडस्ट्रीला गरज आहे. वस्तूची निर्मिती फक्त मटेरियलवरच अवलंबून नसते. त्यासाठी जागा, बिल्डिंग, आर्किटेक्ट, प्लानिंग, कॉम्प्युटर, आॅफिस वर्क , इलेक्ट्रिकल्स, रिसेप्शन, प्युन व सिक्युरिटी अशी सर्वच तऱ्हेची कामे करणाऱ्या तरुण, तज्ज्ञ मंडळीची आज इंडस्ट्रीला गरज आहे. म्हणूनच महत्त्वाची गोष्ट म्हणजे, काम कुठलेही असो, आपल्या आवडीच्या विषयात करिअर करायचे असेल तर आपली शैक्षणिक पात्रता वाढवा व प्रचंड मेहनत घड्याळाकडे न पाहता काम करण्याची तयारी ठेवा, केवळ चांगला कोर्स, चांगले कॉलेज शोधण्यात वेळ न घालवता, तुम्ही स्वत:ला किती अपटुडेट ठेवता यालाच जास्त महत्त्व आहे. तेव्हा कोणत्याही विषयात करिअर करा, स्वत:ला ओळखून झोकून द्यायची तयारी ठेवा - मग बघा यशोदेवी तयासाठी करी गे हार पुष्पांचा.
- प्रा. सुरेश राऊत,
माजी प्राचार्य,
रचनासंसद कला महाविद्यालय

Web Title: Different career opportunities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.