लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : वडाळा ते कासारवडवली मेट्रो ४ मार्गिकेवरील एक अवघड टप्प्याचे काम मार्गी लागले आहे. या मार्गिकेवर चार यू गर्डरची यशस्वीरीत्या उभारणी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने पूर्ण केली आहे. त्यातून आता मेट्रो ४ व मेट्रो ५ मार्गिकेवरील स्थानकांचे इंटीग्रेशन सहजशक्य होणार आहे.
मेट्रो ४च्या पॅकेज १२ मधील कापूरबावडी मेट्रो स्थानक हे मेट्रो ४ आणि मेट्रो ५ या दोन मेट्रो मार्गिकांचे इंटीग्रेटेड स्थानक असेल. दोन्ही मेट्रो स्थानके एकाच जागी येणार असल्याने त्यांची उभारणी करण्याचे काम गुंतागुंतीचे आहे. शनिवारी मध्यरात्री स्थानकाच्या भागात चार गर्डरची उभारणी करण्यात आली. एमएमआरडीएने तीन पोर्टल बीमवर या गर्डरची उभारणी पूर्ण केली.
जागा ताब्यात न आल्याने कारशेडच्या कामाला विलंब
कंत्राटदाराकडून मेट्रो मार्गिकेच्या उभारणीचे काम वेगात सुरू आहे. मात्र, या मेट्रोच्या कारशेडची जागा अद्याप एमएमआरडीएच्या ताब्यात आलेली नाही. त्यातून कारशेडची जागा ताब्यात आल्यावर मेट्रो मार्गिकेच्या उभारणीसाठी दोन वर्षे लागतील. त्यातून ही मेट्रो मार्गिका २०२७ मध्येच प्रवाशांच्या सेवेत येण्याची शक्यता आहे.
अशी केली यू गर्डरची उभारणी
एमएमआरडीएचा कंत्राटदार असलेल्या मिलन कंपनीने या कामासाठी प्रत्येकी ५०० आणि ५५० टन क्षमतेच्या दोन अवजड क्रेन्स, गर्डर वाहून नेण्यासाठी ४ मल्टीअॅक्सल पुलर, कांउंटर वजन वाहून नेण्यासाठी ६ ट्रेलर, ५ मॅन लिफ्टर्स, ४ हायड्रा, २ अॅम्बुलन्स, १०० विविध कुशल कामगार नियुक्त केले होते.
त्याचबरोबर ३० वार्डन लायटनिंग बॅटन बरोबरची व्यवस्थाही केली होती. यांच्या सहाय्याने हे अतिशय गुंतागुंतीचे काम पूर्ण करण्यात आले. रस्त्यावरील वाहतूकीला अडथळा येऊ नये, यासाठी रात्री ११ ते सकाळी ७ या वेळेत हे काम पूर्ण करण्यात आले.