Join us

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ऑनलाईन अभ्यासक्रम पूर्ण करण्यात अडचणी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2020 6:37 PM

उच्च शिक्षण विभागानेही करावी अभ्यासक्रमात २५ % कपात- संघटनांची मागणी

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा , महाविद्यालये शैक्षणिक संस्था बंद आहेत. ऑनलाईन शिक्षण सुरु असले तरी विद्यार्थी , शिक्षकांची उपस्थिती, तांत्रिक अडचणी आणि अभ्यासक्रम पाहता शालेय शिक्षण विभागाकडून अभ्यासक्रमात २५ % कपात करण्यात आली आहे. सध्यस्थितीत शालेय विद्यार्थ्यांना सामना करावा लागणाऱ्या अडचणी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसमोरही आहेत. याच पार्श्वभूमीवर उच्च शिक्षणातही २५ % अभ्यासक्रम कपात करावी अशी मागणी प्रहार विद्यार्थी संघटनेने केली आहे. प्रहार विद्यार्थी संघटना व नॅशनल फोरम फॉर क्वालिटी एज्युकेशन आणि ऑल इंडिया सेटनेट टीचर्स संघटनेच्या शिष्टमंडळाने बुधवारी उच्च व तंत्र शिक्षण कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन ही मागणी केली.राज्यातील कोरोनाची सध्यपरिस्थिती पाहता उच्च शिक्षणातही २५ टक्के अभ्यासक्रम कमी करावा जेणेकरून विद्यार्थ्यांवरील तणाव कमी होण्यास मदत होईल असे मत संघटनेकडून व्यक्त करण्यात आले आहे. प्रथम वर्षाचे प्रवेशही यावर्षी करोना महामारीमुळे उशिराने होत आहेत, शिवाय अजूनही प्रत्यक्षात कॉलेजेस सुरू झालेले नाहीत. ऑनलाइन शिक्षण सुरू असले तरी १०० टक्के अभ्यासक्रम पूर्ण होणे शक्य नाही म्हणून शालेय शिक्षण विभागाप्रमाणे २५ टक्के अभ्यासक्रम कमी करण्यात यावा अशी आम्ही करत असल्याची माहिती प्रहार विदयार्थी संघटनेचे अध्यक्ष मनोज टेकाडे यांनी दिली.  यासाठी त्यांच्या शिष्टमंडळाने उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन निवेदनही दिले आहे.कोविड- १९ च्या वैश्विक महामारीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातच नव्हे तर संबंध जगातील विद्यार्थ्याना या संकटास सामोरे जावे लागत आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षांचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात रेंगाळत असतांना दुसरीकडे प्रथम वर्षाचे सत्र वगळता इतर सत्रांचे अभ्यासक्रम ही ऑनलाइन पद्धतीने सुरू झाले आहे परंतु काही विद्यार्थ्यांना ऑनलाइनच्या माध्यमातून कनेक्टिव्हिटीच्या समस्या तर काहींना आर्थिक समस्या असल्याने उपलब्ध संसाधनांची कमी भासते आहे. त्यामुळे उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या विद्यापीठस्तरीय अभ्यासक्रमातील २५ टक्के भाग कमी करावा जेणेकरून विद्यार्थ्यांचा ताण कमी होईल व शालेय शिक्षण विभागाच्या धर्तीवर तसा शासननिर्णय निर्गमित करून विद्यापीठाना तशा सूचना करण्याची विनंती आम्ही सर्व महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या वतीने मंत्री महोदयांना केली आहे अशी महिती अ‍ॅड.मनोज टेकाडे यांनी दिली.

टॅग्स :शिक्षणमहाविद्यालयशिक्षण क्षेत्रमुंबई