प्रकाशझाेत अग्निशमन दलातील अडचणींवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:07 AM2021-04-24T04:07:02+5:302021-04-24T04:07:02+5:30
अग्निशमन विभागात कर्तव्य बजावताना हौतात्म्य पत्करणाऱ्या जवानांच्या स्मरणार्थ १४ एप्रिल हा दिवस ‘अग्निशमन सेवा दिवस’ तर १४ ते २० ...
अग्निशमन विभागात कर्तव्य बजावताना हौतात्म्य पत्करणाऱ्या जवानांच्या स्मरणार्थ १४ एप्रिल हा दिवस ‘अग्निशमन सेवा दिवस’ तर १४ ते २० एप्रिल दरम्यान ‘अग्निशमन सेवा सप्ताह’ पाळण्यात येतो. यानिमित्ताने अग्निशमन क्षेत्रातील मागण्या व अडीअडचणींवर प्रकाशझाेत टाकण्याचा प्रयत्न.
...................................
आज महाराष्ट्रात एकूण २७ नगरपालिकांमध्ये ९७ अग्निशमन केंद्र आहेत, २२० नगरपरिषदांमध्ये फक्त्त २६ अग्निशमन केंद्र आहेत, तर अंदाजे ७ नगरपंचायतींमध्ये फक्त्त ३ अग्निशमन वाहने आहेत. महाराष्ट्रातील एकूण अधिकारी व कर्मचाऱ्यांची एकूण संख्या फक्त ६००० ते ६५०० इतकीच असून त्यातील ५० टक्क्यांहून जास्त अधिकारी व कर्मचारी मुंबईकडे आहेत म्हणजे मुंबईव्यतिरिक इतर महाराष्ट्रातील अग्निशमन केंद्र फक्त्त ३००० कर्मचाऱ्यांवर कित्येक वर्षांपासून अवलंबून आहेत. या आकडेवारीत थोडाफार फरक असेल, पण एकूण महाराष्ट्र अग्निशमन सेवेचा विचार केल्यास आज या सेवेला अधिकारी, कर्मचारी वर्ग व आधुनिक यंत्रसामग्री पुरेशी पुरवून संपूर्ण महाराष्ट्रभर अग्निशमन सेवेचे आधुनिकीकरण करण्याची गरज आहे.
अग्निशमन कायदा २००६ साली अंमलात आला व त्यानंतर महाराष्ट्र अग्निसेवा संचालनालयाचे सुसज्ज कार्यालय व प्रशिक्षण केंद्र कलिना, सांताक्रूझ येथे निर्माण झाले. परंतु तुटपुंजे कर्मचारी, प्रशिक्षक यामुळे कार्यालयीन कामकाज, प्रशिक्षणावर परिणाम होत होता. हल्लीच महाराष्ट्र शासनाने अग्निशमन सेवेसाठी अग्निशमन अधिकारी व कर्मचाऱ्यांची एकूण ११२ नवीन पदे मंजूर केली, त्यामुळे पुढील काळात नक्कीच याचा दुरगामी परिणाम होऊन अग्निशमन सेवा सुधारण्यास मदत होईल.
आजमितीस महाराष्ट्र अग्निशमन प्रशिक्षण केंद्रातर्फे विविध १० तालुका पातळीवर अग्निशमन प्रशिक्षण चालवली जातात, परंतु महाराष्ट्र अग्निशमन प्रशिक्षण केंद्राकडे पुरेसा प्रशिक्षक वर्ग नसल्यामुळे त्या ठिकाणच्या अग्निशमन केंद्रातील कर्मचाऱ्यांद्वारे प्रशिक्षण दिले जाते, परंतु त्या अग्निशमन केंद्राकडेही पुरेसे अधिकारी नसल्यामुळे प्रशिक्षणाची पातळी दिवसेंदिवस घसरू लागली आहे. त्यासाठी महाराष्ट्र अग्निशमन प्रशिक्षण केंद्रातर्फे पूर्णवेळ प्रशिक्षकांची नेमणूक करून देणे आवश्यक आहे किंवा प्रशिक्षण केंद्रे कमी करणे, त्याचे खासगीकरण किंवा प्रशिक्षक कंत्राटी पद्धतीने भरणे यासारखे निर्णय घेणे आवश्यक आहे.
महाराष्ट्र अग्निशमन प्रशिक्षण संस्थेतून दरवर्षी अंदाजे ५०० ते ६०० अग्निशमन व अंदाजे ५० ते ६० उपस्थानक अधिकारी व अग्निप्रतिबंधक अधिकारी प्रशिक्षण पूर्ण करतात, परंतु बरेच जण आजही नाेकरीपासून वंचित आहेत, याचे कारण म्हणजे मुंबई महानगरपालिकेची भरती नियमावली वेगळी आहे. बऱ्याच महानगरपालिका व नगरपालिकांमध्ये भरती नियमावलीत बदल केलेले नाहीत. महाराष्ट्रातील अग्निशमन सेवेमध्ये महाराष्ट्र अग्निशमन प्रशिक्षण केंद्रातर्फे प्रशिक्षण पूर्ण केलेल्यांनाच प्राधान्य दिले पाहिजे, त्यासाठी शासनाने भरती नियमावलीत बदल केले पाहिजेत.
राष्ट्रीय इमारत संहिता २०१६ अध्याय ४ - कलम ४.१० नुसार मोठ्या शिक्षण संस्था, ३० मीटरपेक्षा उंच व्यापारी इमारती, ६० मीटरपेक्षा उंच राहत्या इमारती, १५ मीटरपेक्षा उंच हॉस्पिटलसारख्या इमारती, पंचतारांकित हॉटेल्ससाठी अग्निशमन अधिकाऱ्याची नेमणूक करण्याबाबतच्या सूचना केलेल्या आहेत, जर महाराष्ट्र अग्निशमन संचालनालयाने पुढाकार घेऊन हे शासनाच्या निदर्शनास आणून शासन निर्णय निर्गमित केल्यास, तसेच दरवर्षी इमारतीच्या परवाना नूतनीकरण्याच्या वेळी अग्निशमन अधिकाऱ्याने या कलमाची काटेकोर अंमलबजावणी केल्यास प्रशिक्षण पूर्ण केलेले तसेच अग्निशमन सेवेतून सेवानिवृत्त, ऐच्छिक सेवानिवृत्त झालेल्या अग्निशमन अधिकारी, कर्मचाऱ्यांना महाराष्ट्रात सहज नोकरी मिळणे शक्य आहे.
मुंबई अग्निशमन दलात आज महिला कर्मचारी चांगल्या प्रकारे अग्निशामक व अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. नागपूर येथील राष्ट्रीय अग्निशमन सेवा विद्यालयातही महिलांना प्रवेश दिला जातो. अनेक महिला देशभर अग्निशमन दलात उच्च पदावर कार्यरत आहेत. याचा विचार करून महिलांना राष्ट्रीय अग्निशमन सेवा विद्यालयात प्रवेश दिला गेला पाहिजे.
या व अशा अनेक छाेट्या-मोठ्या मागण्या वजा अडचणी साेडवणे हे अग्निशमन दलाच्या बळकटीकरणासाठी अत्यंत गरजेचे आहे. अग्निशमन संचालनालयाने या मागण्या वजा अडीअडचणी दूर करण्यासाठी पुढाकार घेतला तर तीच खऱ्या अर्थाने वीरगती प्राप्त झालेल्या अग्निशमन जवानांना श्रद्धांजली होऊ शकते.
- सुभाष राणे
(लेखक मुंबई अग्निशमन दलातील निवृत्त अधिकारी आहेत.)