नैसर्गिक आपत्तीतील मदत अटींच्या विळख्यात, जाचक अटींमुळे शेतपिकाची नुकसान भरपाई मिळण्यात अडचणी

By दीपक भातुसे | Published: April 7, 2023 07:08 PM2023-04-07T19:08:32+5:302023-04-07T19:08:40+5:30

सलग पाच दिवस पाऊस पडल्यानंतर ती नैसर्गिक आपत्ती म्हणून जाहीर केली जाईल आणि शेतकऱ्यांना त्यानुसाार मदत केली जाईल.

Difficulties in getting compensation for crop damage due to oppressive conditions in natural calamities | नैसर्गिक आपत्तीतील मदत अटींच्या विळख्यात, जाचक अटींमुळे शेतपिकाची नुकसान भरपाई मिळण्यात अडचणी

नैसर्गिक आपत्तीतील मदत अटींच्या विळख्यात, जाचक अटींमुळे शेतपिकाची नुकसान भरपाई मिळण्यात अडचणी

googlenewsNext

मुंबई: सलग पाच दिवस पाऊस पडल्यानंतर ती नैसर्गिक आपत्ती म्हणून जाहीर केली जाईल आणि शेतकऱ्यांना त्यानुसाार मदत केली जाईल, असा निर्णय राज्य मंत्रींडळाने घेतला असला तरी ही मदत जाचक अटींच्या विळख्यात अडकण्याची चिन्हे आहेत. सलग पाच दिवस किमान दहा मिलिमीटर पाऊस झाल्यास त्या परिमंडळामध्ये अतिवृष्टी झाली असे गृहीत धरून भरपाई देण्यात येईल अशा प्रकारचा निर्णय राज्य मंत्रीमंडळाने घेतला आहे. अशा अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळेल, त्यामुळे हा निर्णय शेतकऱ्यांना दिलासा देणारा ठरेल असे वाटत असतानाच यासाठी असलेल्या अटी मात्र अत्यंत जाचक आहेत.

सरकारच्या खर्चात बचत होणार

यंदाच्या हंगामात झालेल्या सलग पावसामुळे झालेल्या नुकसानीपोटी मदतीसाठी औरंगाबाद, अमरावती, सोलापूर विभागातून ३१२८ कोटी ९६ लाख रुपयांचे प्रस्ताव सादर झाले आहेत. ही मदत देण्यासाठी हिवाळी अधिवेशनात ३३०० कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली आहे. मात्र हे प्रस्ताव सरसकट प्राप्त झाले असून शास्त्रीय पद्धतीने निकष लागू झाल्यास मूळ प्रस्तावांइतकी रक्कम द्यावी लागणार नाही, त्यामुळे संभाव्य खर्चात बदल होईल असा सरकारचा अंदाज असल्याचे मंत्रीमंडळासमोर सादर झालेल्या टिपण्णीतच नमूद करण्यात आले आहे.

 जाचक अटी 

- १५ जुलै ते १५ ऑक्टोबर या कालावधीत सलग पाच दिवस प्रत्येक दिवशी किमान दहा मिली मीटर पाऊस झाल्यास
- मागील दहा वर्षात त्या परिमंडळामध्ये सरासरी पर्जन्यमानापेक्षा ५०% किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस पडलेला असावा
- त्यानंतर पुढील पंधरा दिवस पिकाचा सामान्यकृत वनस्पती निर्देशांक (एन.डी.व्ही.आय) तपासला जाईल
- हा निर्देशांक ०.५ पेक्षा कमी असला पाहिजे
- ज्या तारखेला सतत पावसाची सुरुवात झाली त्या दिवसाचा वनस्पती निर्देशांक हा १५ व्या दिवसाच्या निर्देशांकापेक्षा जास्त असायला हवा
- त्यानंतर महसूल मंडळातील बाधित क्षेत्राचे सर्वेक्षण करुन पंचनामा करण्यात येतील
- शेतीपिकांचे 33 टक्के पेक्षा जास्त नुकसान झाले असल्यास मदत देण्यात येईल
- हे सर्व पंचनामा सॅटेलाईटच्या माध्यमातून केले जाणार आहेत

नुकसान निश्चितीसाठी गाव हे एकक न ठेवता परिमंडळ एकक ठेवण्यात आल्यामुळे पर्जन्यमापक यंत्र बसविलेल्या गावात पाऊस झाला नाही व त्याच परिमंडळातील इतर गावात अतिवृष्टी झाली तरीही अतिवृष्टी झालेल्या गावातील शेतकरी नुकसान भरपाईस पात्र ठरणार नाहीत.

वनस्पती निर्देशांक (एन.डी.व्ही.आय) म्हणजे काय ? 

सततच्या पावसामुळे शेतात पाणी साचून राहिल्यास पिकांचे नुकसान होते. प्राणवायूच्या कमतरतेमुळे वनस्पती शोषण क्रियेत बदल होऊ शकतो. जमिनीतील बियाणांच्या उगवण क्षमता मंदावते. मुळांची वाढ विस्कळित झाल्याने वाढ मंदावते. ढगाळ वातावरणामुळे कीड आणि रोगांची लागण होते. अशा अनेक बाबी उद्भवल्याचा वनस्पतीवर काय परिणाम झाला आहे किंवा पीक सदृढ आहे याचे मोजमाप या यंत्रणेद्वारे केले जाणार आहे.

नव्या पद्धतीमुळे जटिलता वाढविण्यात आली असून शेतकरी मदतीपासून आणखी दूर लोटले गेले आहेत. हे अटीशर्तींचे सरकार असल्यामुळे घोषणा करायची, मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मदत मिळणार नाही याची काळजीही घ्यायची हा फडणवीस सरकारचा नेहमीचा कित्ता यावेळीही गिरवण्यात आला आहे. - डॉ अजित नवले, राष्ट्रीय सहसचिव अखिल भारतीय किसान सभा

Web Title: Difficulties in getting compensation for crop damage due to oppressive conditions in natural calamities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.