डीआयजी मनोजकुमार शर्माही केंद्रीय सेवेत; राज्य सरकारला आणखी एक धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2021 04:24 AM2021-03-21T04:24:52+5:302021-03-21T04:25:22+5:30
महाराष्ट्र पोलीस दलातून केंद्रात प्रतिनियुक्तीवर जाणारे शर्मा हे गेल्या तीन महिन्यांतील तिसरे आयपीएस अधिकारी आहेत.
जमीर काझी
मुंबई : स्फोटक कार प्रकरणात पोलिसांचा सहभाग व वरिष्ठ अधिकाऱ्यांचे रुसवेफुगवे समाेर आल्यानंतर आता राज्य सरकारला आणखी एक धक्का बसला आहे. राज्य सुरक्षा महामंडळातील उपमहानिरीक्षक मनोजकुमार शर्मा यांची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात (सीआयएसएफ) पाच वर्षांसाठी नियुक्ती झाली आहे.
महाराष्ट्र पोलीस दलातून केंद्रात प्रतिनियुक्तीवर जाणारे शर्मा हे गेल्या तीन महिन्यांतील तिसरे आयपीएस अधिकारी आहेत. विशेष म्हणजे, हे तीनही अधिकारी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते. वर्षाच्या सुरुवातीला तत्कालीन पोलीस महासंचालक सुबोध जायसवाल सीआयएसएफचे प्रमुख म्हणून नियुक्ती झाल्याने ते ७ जानेवारीला पदावरून कार्यमुक्त झाले. त्यानंतर ८ फेब्रुवारीला नागरी संरक्षण विभागाच्या (सिव्हिल डिफेन्स) महासंचालक रश्मी शुक्ला यांची केंद्रात प्रतिनियुक्ती झाली. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) अपर महासंचालक म्हणून केंद्रीय गृह विभागाने त्यांची नियुक्ती केल्याने त्यांना तातडीने कार्यमुक्त करण्यात आले. त्यानंतर आता मनोजकुमार शर्मा यांच्या ‘सीआयएसएफ’मध्ये पाच वर्षे प्रतिनियुक्तीचे आदेश केंद्रीय गृह विभागाने काढले आहेत. शर्मा हे गेल्या सात महिन्यांपासून महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात कार्यरत आहेत.
‘ट्वेल्थ फेल’मुळे चर्चेत
प्रामाणिक व संवेदनशील अधिकारी म्हणून ओळखले जाणारे मनोजकुमार शर्मा हे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून केंद्रीय स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांच्या ‘ट्वेल्थ फेल’ या संघर्षमय वाटचालीवरील आत्मचरित्रात्मक पुस्तकाने देशभरातील युवकांवर गारुड घातले. ऑनलाइन सर्वाधिक विक्री असलेल्या पुस्तकांत त्याचा समावेश आहे.