तरेंच्या उमेदवारीत खोडा?

By Admin | Published: April 16, 2016 01:08 AM2016-04-16T01:08:56+5:302016-04-16T01:08:56+5:30

पालखीतील मानापमानावरून कार्ल्याच्या एकवीरा गडावर पेणच्या मानकऱ्यांसोबत ठाण्यातील भक्तांची झालेली हाणामारी, त्यात पेणच्या मानकऱ्यांची बाजू घेतल्याने ठाण्याच्या भक्तांत

Digested in the candidature of Tarun? | तरेंच्या उमेदवारीत खोडा?

तरेंच्या उमेदवारीत खोडा?

googlenewsNext

ठाणे : पालखीतील मानापमानावरून कार्ल्याच्या एकवीरा गडावर पेणच्या मानकऱ्यांसोबत ठाण्यातील भक्तांची झालेली हाणामारी, त्यात पेणच्या मानकऱ्यांची बाजू घेतल्याने ठाण्याच्या भक्तांत पसरलेली नाराजी आणि त्यातून अनंत तरे यांच्या पुतळ्याच्या दहनाचा पेटलेला वाद शिवसेनेत गाजू लागला आहे. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेच्याच उपनेत्याचा पुतळा जाळण्यापर्यंत मजल गेल्याने यामागचा बोलविता धनी कोण आहे, याची चर्चा सुरू झाली आहे. तरे यांना उमेदवारी मिळणार की नाही, ते लवकरच स्पष्ट होईल.
अवघ्या दोन महिन्यांत होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीतील भक्कम दावेदार असलेल्या तरेंच्या उमेदवारीलाच यातून ग्रहण लावण्याचा प्रयत्न सुरू झाल्याचेही सांगितले जात आहे. यातून पक्षातील गटबाजीही उघड झाली असून पुढील वर्षी होणाऱ्या पालिका निवडणुकीच्या तोंडावर ज्येष्ठ-निष्ठावंतांचा मान राखण्याचा मुद्दाही पुढे आला आहे. या घटनांमागे राजकारण असल्याचा स्पष्ट आरोप तरे यांनी केल्याने यातून पक्षांतर्गत खदखदही बाहेर आली आहे.
ठाणे आणि पेणच्या भाविकांतील पालखीच्या मानापमानाचे, त्यात तरे यांनी पेणच्या भाविकांचा मान राखल्याचे आणि ठाण्यातील भाविकांना झालेल्या मारहाणीचे पडसाद गुरुवारी रात्री ठाण्यात उमटले. चेंदणी कोळीवाड्यातील तरूणांनी तरे यांच्या पुतळ्याचे दहन करून निषेध केला.
कार्ल्याच्या एकवीरा गडावरील पालखीच्या मानातून ठाणेकर आणि पेणचे भाविक परस्परांत भिडले होते. त्यात काही जण जखमी झाल्याने उत्सवाला गालबोट लागले. यातील दोषींवर कारवाई करण्याची मागणी एकवीरादेवी संस्थानचे अध्यक्ष असलेल्या अनंत तरे यांनी केले. तरे यांनी पेणच्या भाविकांचा पालखीचा मान मान्य केल्याने ते पेणवासीयांच्या बाजूने उभे राहिल्याचा राग मनात धरून चेंदणी कोळीवाड्यात त्यांच्या पुतळ्याचे दहन झाले. ठाण्याचे नेते असूनही त्यांनी आमच्या बाजूने कौल न देता पेणला झुकते माप दिल्याने त्यांचा निषेध करत पुतळ्याचे दहन केल्याचे या कोळी नेत्यांचे मत आहे.
यासंदर्भात संपर्क साधला असता अनंत तरे म्हणाले, मी संस्थेचा अध्यक्ष असलो तरी ज्याला मान मिळणे अपेक्षित आहे, त्यालाच तो मिळाला पाहिजे, या मताचा आहे. त्याचे ठाण्यात उमटलेले पडसाद पाहता यामागे नक्कीच काहीतरी राजकारण शिजत असल्याची शक्यता त्यांनी वर्तविली.

पुन्हा डावलण्याची भीती
दोन महिन्यांवर आलेल्या विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी सध्या तरे यांची जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. त्यांना यापूर्वीही पक्षाकडून डावलण्यात आले आहे. ठाणे शहर मतदारसंघातून विधानसभेची जागा लढवण्यासाठी ते इच्छुक होते, परंतु ऐनवेळी त्यांचा पत्ता कापून त्यांच्याऐवजी रवींद्र फाटक यांना संधी देण्यात आली.
त्यामुळे नाराज तरे यांनी थेट शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातूनच उमेदवारी अर्ज भरून त्यांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर, समजूत काढताना त्यांना विधान परिषदेचे गाजर दाखवण्यात आले होते.
परंतु, त्या निवडणुकीत फाटक यांचा पराभव झाल्याने त्यांनीही आधीचा अनुभव जमेस धरत विधान परिषदेसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आर्थिक स्थिती भक्कम असलेला उमेदवारच विधान परिषदेच्या निवडणुकीत तग धरू शकतो, असा आजवरचा अनुभव आहे. त्यामुळे फाटक यांचे नाव अधिक चर्चेत असले, तरी अन्य पाच दावेदारही या पंक्तीत आहेत.

Web Title: Digested in the candidature of Tarun?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.