मुंबई : अनेक कालावधीपासून एसटी महामंडळाचे अकाऊंट समाज माध्यमांवर नव्हते. ती उणीव भरून काढण्यासाठी एसटी महामंडळाने शनिवारपासून अधिकृत ट्विटर अकाउंट सुरू केले आहे. पुढील काही दिवसात इंस्टाग्रामवर देखील एसटी महामंडळाचे अकाऊंट तयार होणार आहे.
काही दिवसांपूर्वी एसटीचे बनावट अकाऊंट ट्विटर, इंस्टाग्रामवर देखील आढळून आले होते. एसटीने त्याची दखल घेत कारवाईचे संकेत दिले होते. 'दोन दिवसात एसटीचे अधिकृत अकाऊंट सुरु करू' असे ट्विट परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांनी केले होते. त्यानंतर एसटी महामंडळ कामाला लागले. त्यामुळे शनिवारपासून अधिकृत ट्विटर अकाऊंट सुरू झाले.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी महामंडळ)चे अधिकृत ट्विटर हॅंडल शनिवारी प्रसिद्ध करण्यात आले आहे. यापुढे एसटी महामंडळचे सर्व घटनाक्रम या ट्विटर अकाऊंटच्या माध्यमातून आपल्या सर्वांपर्यंत पोहचविण्यात येतील, अशी माहिती परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली.
------------------
मागील अनेक वर्षांपासून एसटीने समाज माध्यमावर सक्रीय व्हावे, अशी इच्छा होती. पण अनेक वर्षांनी एसटीने उचलले पाऊल पाहून आनंद वाटला. एसटीला मिळणाऱ्या प्रवासी सूचना, तक्रारीची दखल महामंडळ वेळोवेळी घेईल, असा विश्वास वाटतो. फेसबुक, इंस्टाग्राम या समाज माध्यमांवर देखील एसटी लवकरच सक्रीय व्हावे, अशी प्रतिक्रिया एसटी प्रवासी रोहित धेंडे यांनी दिली.