लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : लॉकडाऊनच्या काळात वीजग्राहकांना प्रत्यक्ष कन्झ्युमर केअर सेंटर्समध्ये जाणे शक्य नसल्याने चौकशी आणि तक्रार निवारणासाठी ग्राहक डिजिटल पद्धतींकडे वळल्याचे दिसून आले. सुमारे ५.५ लाख वीजग्राहकांनी चॅटबॉट, वेबसाइट, ट्विटर व इतर सोशल मीडिया हँडल्ससारख्या विविध डिजिटल प्लॅटफॉर्म्सचा वापर केला. फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांमुळे तंत्रज्ञानाच्या वापरामध्ये वाढ झाल्याचे निदर्शनास आले.
५.५ लाख वीजग्राहकांपैकी एकूण ३.७ लाख ग्राहकांनी वेबसाइटद्वारे संपर्क साधला. गेल्या वर्षी अशा ग्राहकांची संख्या अवघी ८० हजार होती. १.५ लाख ग्राहकांनी चॅटबॉट इलेक्ट्रा सेवेचा वापर केला. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा आकडा १० पट जास्त आहे. २०१९ मध्ये केवळ ९२१५ ग्राहकांनी चॅटबॉट सेवेचा वापर केला होता. यावर्षी २८,१९६ ग्राहकांनी ट्विटरद्वारे कंपनीशी संपर्क साधला तर १९३३ जणांनी फेसबुकद्वारे एईएमएलच्या सेवा प्राप्त केल्या. २०१८ मध्ये केवळ १८ ग्राहकांनी फेसबुकच्या माध्यमातून संपर्क साधला होता तर ७९८३ ग्राहकांनी ट्विटरचा वापर केला होता, अशी माहिती अदानी इलेक्ट्रिसिटीने दिली. डिजिटल प्लॅटफॉर्म्स वापरणाऱ्या ५.५ लाख ग्राहकांव्यतिरिक्त आणखी १.१ लाख ग्राहकांनी व्हॉट्सॲप सेवेचा वापर केला. डिजिटल सेवेच्या वापरामध्ये ४०० टक्के वाढ झाल्याचे आढळून आले. २०१९ मध्ये ५.५ लाख ग्राहकांपैकी केवळ १ लाख ग्राहकांनी डिजिटल प्लॅटफॉर्म्सचा वापर केला होता.