मुंबई:मुंबईकरांना हवामानासह प्रदूषणाची इत्थंभूत माहिती देणारे १४ पैकी ११ डिजिटल डिस्प्ले बोर्ड गेल्या काही दिवसांपासून अद्ययावत करण्याच्या नावाखाली बंद आहेत. त्यामुळे मुंबईकरांना हवामानासह हवेच्या गुणवत्तेची माहिती मिळत नसल्याचे चित्र आहे. केंद्र सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयांतर्गत भारतीय उष्णकटिबंधीय हवामान शास्त्र संस्था (पुणे) व मुंबई महापालिकेद्वारे मुंबईत ठिकठिकाणी एकूण १४ हवामानदर्शक डिजिटल डिस्प्ले लावण्यात आले आहेत. त्यापैकी ११ बंद असून, ३ सुरूआहेत.
माहिती संकलित केली, तरी प्रदर्शित होत नाही-
१) गेल्या ८ ते २० वर्षापासून हे डिस्प्ले लावण्यात आले आहेत.
२) लोखंडी खांबावर बसविण्यात आलेले हे डिस्प्ले उच्च दर्जाचे आहेत.
३) मुंबईसारख्या खारट वातावरणातही डिस्प्ले टिकून आहेत.
४) आता ३ डिस्प्ले अद्ययावत करण्याचे काम सुरू असले, तरी ते पूर्ण कधी होणार? याबाबत समिती वाच्यता करत नाही.
५) उर्वरित ११ डिस्प्ले केव्हा अद्ययावत होणार? याबाबत संस्था काहीच स्पष्ट करत नाही.
६) मुळात मुंबईसारख्या शहरात १४ नाहीतर किमान ५० डिस्प्ले बोर्ड आवश्यक आहेत. मात्र, आता तर केवळ तीनच काम करत आहेत.