फोन टॅपिंग प्रकरण; उच्च न्यायालयाने विनंती फेटाळली
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : फोन टॅपिंगप्रकरणी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने जप्त केलेली कागदपत्रे आणि डिजिटल उपकरणे तपासाचा भाग म्हणून ताब्यात देण्याची सीबीआयने केलेली विनंती दंडाधिकारी न्यायालयाने गुरुवारी फेटाळली. ज्येष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी पोलीस बदल्यांत राजकारणी व पोलिसांनी एकमेकांशी केलेल्या हातमिळवणीबाबत पोलीस महासंचालकांकडे अहवाल सादर केला होता.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भ्रष्टाचार केल्याचा आराेप करीत मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिले. देशमुख यांच्यावर केलेल्या या आरोपांचा तपास सीबीआय करीत आहे. या तपासाचाच भाग म्हणून रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणी मुंबईच्या सायबर सेलने जप्त केलेली कागदपत्रे व डिजिटल उपकरणे आपल्या ताब्यात द्यावी, यासाठी सीबीआयने मुख्य दंडाधिकारी न्यायालयात अर्ज केला.
सीबीआयला पुरावे देण्यासाठी सायबर सेलच्या वतीने विशेष सरकारी वकील अजय मिसार यांनी आक्षेप घेतला. सायबर गुन्ह्यासंदर्भात संबंधित कागदपत्रे आणि डिजिटल उपकरणे जप्त केली आहेत आणि हे सर्व कलिना फॉरेन्सिक लॅबमध्ये छाननीसाठी पाठवले आहे. ते आता मागवू शकत नाही; कारण ते तपासातील महत्त्वाचे पुरावे असल्याचे त्यांनी सांगितले.
* राज्य सरकारने मंजुरी दिलेली नाही!
परमबीर सिंग यांनी पत्रात केलेल्या आरोपांचा व याचिकाकर्त्या जयश्री पाटील यांनी केलेल्या आरोपांचाच तपास सीबीआयने करावा, त्यात पोलीस बदल्यांबाबत तपास करण्याचे आदेश सीबीआयला देण्यात आलेले नाहीत. सीबीआयला अद्याप राज्य सरकारने मंजुरी दिलेली नाही, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले.
.......................................