लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गुढीपाडवा हा मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचा सण. शोभायात्रा, चित्ररथ, भव्य रांगोळ्या आणि सोबतीला ढोल-ताशांच्या झंकाराने या दिवशी मुंबापुरी दुमदुमून निघते. परंतु, कोरोनाने गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही पाडव्याच्या उत्साहात अडथळा आणला आहे. यंदा डिजिटल गुढी उभारून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी हातभार लावण्याचा संकल्प मुंबईतील मंडळांनी केला आहे.
गुढीपाडव्याला गिरगावात सर्वात मोठी शोभायात्रा निघते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले नसले तरी नागरिकांनी आपापल्या घरात गुढी उभारून हा उत्सव साजरा करावा, रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागल्यामुळे घराबाहेर न पडता डिजिटल माध्यमातून एकमेकांना पाडव्याच्या शुभेच्छा द्याव्यात, असे आवाहन केल्याचे गिरगावमधील शोभायात्रेचे आयोजक वीरेंद्र पवार यांनी सांगितले.
गिरणगावात दरवर्षी शोभायात्रेसोबतच गुढीपाडव्याचे महत्त्व सांगणारी बैठक आयोजित केली जाते. मराठी नववर्ष, महाराष्ट्रात साजरे होणारे सण याविषयी त्यात मार्गदर्शन केले जाते. यंदा जमावबंदी लागू असल्यामुळे डिजिटल माध्यमाचा आधार घेत या कार्यात खंड पडू दिला जाणार नाही. झूम ॲपद्वारे ही बैठक घेतली जाईल, अशी माहिती गिरणगावातील शोभायात्रेच्या आयोजनात महत्त्वाचा वाटा उचलणारे महेश भिंगार्डे यांनी दिली.
कुर्लावासीयांनीही यंदा गुढीपाडव्याचा उत्साह कमी होऊ न देता डिजिटल माध्यमातून नववर्षाचे स्वागत करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी येथील नववर्ष यात्रा समितीने विशेष यंत्रणा तयार केली आहे. एका व्हॉट्सॲप क्रमांकाद्वारे कुर्ल्यातील नागरिकांना जोडले जाणार आहे. नागरिक आपापल्या घरी पारंपरिक वेशात गुढी उभारून त्याची छायाचित्रे या क्रमांकावर पाठवतील. त्यानंतर नववर्ष यात्रा समितीच्या माध्यमातून ही छायाचित्रे समाजमाध्यमांवर प्रसारित केली जाणार आहेत.
गोराई येथील स्वयंम युवा प्रतिष्ठानतर्फे गुढीपाडव्यानिमित्त दरवर्षी भव्य शोभायात्रा काढली जाते. राज्य सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत ती रद्द करण्यात आली आहे. त्याबदल्यात विविध सामाजिक उपक्रम राबवून शासनाला सहकार्य केले जाणार आहे. नुकतेच या मंडळाने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. त्यावेळी १०० पिशव्या रक्त संकलन करण्यात आले.
.................
शोभायात्रा निघणार नसली तरी गिरगावातील चौका-चौकांत सजावट करण्याचा आमचा मानस होता. परंतु, मंडळाचे कार्यकर्ते बाहेर पडल्यास अन्य नागरिकही गर्दी करण्याची शक्यता असल्यामुळे, हे नियोजन रद्द केले आहे. लोकांनी आभासी पद्धतीने गुढीपाडवा साजरा करावा, असे आवाहन समाजमाध्यमांद्वारे करण्यात आले आहे.
-योगेश प्रभू, विवेकानंद प्रतिष्ठान, गिरगाव
...........
दादरवासीयांचा लसीकरणाचा संकल्प
गुढीपाडव्याच्या दिवशी शोभायात्रा किंवा अन्य कार्यक्रमांचे आयोजन न करता जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्याचा संकल्प दादरमधील ज्ञानदा प्रबोधन या संस्थेने केला आहे. माहिमच्या श्री हॉस्पिटलमध्ये पालिकेने उभारलेल्या लसीकरण केंद्रात येणाऱ्या नागरिकांचे तोंड गोड करून त्यांना नववर्षाच्या शुभेच्छा देणार आहोत, तसेच कोरोनाकाळात निर्बंधांचे पालन करण्याचे आवाहन करणार असल्याची माहिती या संस्थेचे प्रशांत पाल यांनी दिली.