आयआयटी मुंबईतील विद्यार्थी बनले डिजिटल गुरू; गणित, विज्ञानाचे प्रादेशिक भाषांतून धडे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2019 01:55 AM2019-10-10T01:55:48+5:302019-10-10T01:56:03+5:30
शालेय विद्यार्थ्यांमध्ये गणित आणि विज्ञान या विषयांची आवड निर्माण व्हावी, यासाठी आयआयटी मुंबईच्या एनएसएस विभागाने ओपन लर्निंग इनिशिएटिव्ह हा उपक्रम सुरू केला आहे.
- सीमा महांगडे
मुंबई : गणित आणि विज्ञान हे विषय तसे समजायला अवघडच. पण त्यांच्या संकल्पना व्हिडीओमधून स्पष्ट होणार असतील तर विद्यार्थी ते समजून घेण्यात अधिक रुची घेतात; शिवाय त्या त्यांना पटकन आत्मसातही होतात. शालेय विद्यार्थ्यांमध्ये गणित आणि विज्ञान या विषयांची आवड निर्माण व्हावी, यासाठी आयआयटी मुंबईच्या एनएसएस विभागाने ओपन लर्निंग इनिशिएटिव्ह हा उपक्रम सुरू केला आहे. हा उपक्रम ओएलआय नावाच्या यू ट्युब चॅनेलच्या रूपात असून शालेय विद्यार्थ्यांना गणित व विज्ञान विषयांचे दर्जेदार शिक्षण या चॅनेलच्या व्हिडीओंमधून दिले जाते. सध्या या चॅनेलचे १ लाखाहून अधिक सबस्क्रायबर आहेत.
२०१५ साली आयआयटी मुंबईच्या एनएसएस विभागाच्या एज्युकेशनल आउटरीच नावाच्या विभागाच्या अखत्यारीत या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. शालेय विद्यार्थ्यांना गणित आणि विज्ञान सोपे करून सांगायचे यासाठी आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषेत अनेक व्हिडीओ उपलब्ध केले आहेत. मात्र प्रादेशिक भाषांत गणित, विज्ञान अशा किचकट वाटणाऱ्या विषयांच्या संकल्पना उलगडून सांगणारे व्हिडीओ उपलब्ध नसल्याचे या विद्यार्थ्यांच्या लक्षात आले. त्यामुळे या संकल्पना प्रादेशिक भाषांत आणि व्हिडीओज्च्या माध्यमातून मांडण्याचा उपक्रम या विद्यार्थ्यांनी हाती घेतल्याची माहिती एज्युकेशनल आउटरीच विभागाचा प्रमुख व आयआयटीच्या एनएसएस विभागाच्या तिसºया वर्षाला असणाºया वैभव चंदन याने दिली.
ओएलआय यू ट्युब चॅनेलला आतापर्यंत ८,४३४,६६२ व्ह्युज मिळाले आहेत. एज्युकेशनल आउटरीचच्या टीमने हिंदी, मराठी, तामिळ, कन्नड, मल्याळम, गुजराती, ओडिया, तेलगू, बंगाली अशा ९ प्रादेशिक भाषांत ३२० व्हिडीओ तयार केले आहेत. सहावी ते दहावीच्या पाठ्यपुस्तकांतील संकल्पनाचे विश्लेषण करणारे हे व्हिडीओ विनामूल्य असून क्रिएटिव्ह कॉमन लायसन्स अंतर्गत नोंदणीकृत असल्याने विद्यार्थी ते सहज डाउनलोड किंवा शेअर करू शकत असल्याची माहिती वैभव चंदन याने दिली.
संशोधन वृत्ती वाढविण्याचा प्रयत्न
२१ व्या शतकात विज्ञान, गणित, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान हे विषय खूपच महत्त्वाचे असल्याने विद्यार्थ्यांमध्ये प्राथमिक शिक्षणापासूनच संशोधन वृत्ती वाढविणे अत्यावश्यक आहे. त्या दृष्टीने आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी हा उपक्रम हाती घेतला असून, आता त्याचा विस्तार आणखी वाढविण्याच्या प्रयत्नात आहेत.