मुंबई : कोरोनाच्या काळात अखंडपणे आरोग्यसेवा पुरवण्यासाठी डिजिटल आरोग्यसेवा ही अत्यावश्यक आहे, असे मत पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक आलोक कंसल यांनी व्यक्त केले. कंसल यांच्या हस्ते रेलटेल आणि सी-डॅकच्या सहकार्याने कार्यान्वित करण्यात आलेल्या मुंबई सेंट्रल येथील जगजीवन राम रुग्णालयातील रुग्णालय माहिती व्यवस्थापन प्रणालीचे उद्घाटन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
रुग्णालय माहिती व्यवस्थापन प्रणाली सुरू झाल्याने ऑनलाइन नोंदणी, टेलिकन्सल्टेशन आणि औषधांचे वितरण सोपे होईल. या प्रणालीमुळे आरोग्य उपक्रमांची परिचालन कार्यक्षमता वाढण्यास, रुग्णांच्या आरोग्याशी संबंधित माहिती संकलन आणि वापर वाढविण्यास, इलेक्ट्रॉनिक मेडिकल रेकॉर्ड (ईएमआर) तयार करण्यास आणि विविध रेल्वे आरोग्य सुविधांमध्ये डेटा सामायिक करण्यास खूप मदत होईल. एचएमआयएसद्वारे, सर्व रुग्णांच्या नोंदी, डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन / सल्लामसलत आणि प्रयोगशाळेच्या अहवाल भविष्यकाळात उपयोगात आणता येणार आहेत.
कंसल म्हणाले की, साथीच्या काळात, डिजिटाइज्ड हेल्थकेअर ही अखंड सेवा प्रदान करण्यासाठी काळाची गरज आहे. रुग्णालय माहिती व्यवस्थापन प्रणालीमध्ये विविध सेवा देण्यात येणार आहेत. ओपीडी, आयपीडी, लॅब्स, फार्मसी, रेफरल, वैद्यकीय परीक्षा, आजारी-फिट प्रमाणपत्रे, वैद्यकीय दाव्यांची प्रतिपूर्ती याचा रुग्णांना फायदा होईल.