मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते महिला स्वयंरोजगार योजनेचा डिजिटल शुभारंभ
By मनोहर कुंभेजकर | Published: May 13, 2023 11:44 PM2023-05-13T23:44:28+5:302023-05-13T23:44:58+5:30
27 हजारांहून अधिक महिलांना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य
मनोहर कुंभेजकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: महानगरपालिकेच्या वतीने, सुमारे 27 हजार महिलांना स्वयंरोजगार देणाऱ्या योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते डिजिटल पद्धतीने करण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात 25 महिलांना स्वयंरोजगार अर्थसहाय्य प्रमाणपत्र देण्यात आले. खासदार राहुल शेवाळे यांच्या पुढाकाराने योजना कार्यान्वित करण्यात आली. चुनाभट्टी येथील सोमय्या मैदानात आज सायंकाळी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला उओंगर पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, स्थानिक खासदार राहुल शेवाळे, मुंबई भाजपा अध्यक्ष,आमदार अँड.आशिष शेलार, पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल ,आमदार सदा सरवणकर, आमदार मंगेश कुडाळकर, आमदार कालिदास कोळंबकर, आमदार प्रसाद लाड, आमदार तमिळ सेल्वन, आमदार प्रकाश सुर्वे, आमदार राजहंस सिंह, आमदार यामिनी जाधव, आमदार दिलीप लांडे, शिवसेना उपनेत्या शीतल म्हात्रे, माजी नगरसेविका कामिनी राहुल शेवाळे, सचिव संजय म्हशिलकर, नरेश म्हस्के, सुशांत शेलार यांच्या सह अन्य मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री @mieknathshinde आणि उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांच्या हस्ते आज @mybmc च्या महिला व बालकल्याण योजनेंतर्गत २७ हजार महिलांना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्याच्या लाभ वितरणाचा शुभारंभ करण्यात आला. यामध्ये १२ हजार ६३२ महिलांना शिवणयंत्र, १२ हजार ४८२ महिलांना घरघंटी आणि १… pic.twitter.com/IqlBQu0xnK
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) May 13, 2023
मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मुंबई शहर आणि उपनगरातील महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्यासाठी महिला व बालकल्याण योजने अंतर्गत लाभार्थ्यांना घरघंटी, शिवणयंत्र, मसाला कांडप या यंत्रसामुग्री घेण्यासाठी आर्थिक सहाय्य करण्यात येणार आहे. या योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांनी रिमोट कंट्रोलद्वारे करताच लाभार्थी महिलांच्या मोबाईलवर व्हॉट्सॲप च्या माध्यमातून लाभार्थी प्रमाणपत्र प्राप्त झाले. पालिकेच्या वतीने या योजनेसाठी 250 कोटींची तरतूद करण्यात आल्याचे अधोरेखित करत मुख्यमंत्र्यांनी पालिका आयुक्तांचे आभार मानत या योजनेतून स्वयंरोजगार करणाऱ्या महिलांना सहाय्य करण्यासाठी राज्य सरकार आणि पालिकेने मिळून मार्केटिंग आणि ब्रंडिगचा आराखडा तयार करण्याची सूचना केली.
"देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर करण्याचा आम्ही प्रयत्न करत असून मुंबईकरांचा पैसा मुंबईकरांसाठीच वापरला जाईल. काही लोकांनी 25 वर्षे मुंबईला केवळ खड्डे दिले. त्यावेळी जसं काम चालत होतं, तसं काम आता चालू देणार नाही. मुंबईत सुमारे 900 ठिकाणी सौंदर्यीकरण केले. या विकासकामांमुळे ज्यांना पोटदुखी होईल, त्यांचाही इलाज आपला दवाखाना इथे करण्यात येईल" अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेसाठी मुख्यमंत्री, खासदार राहुल शेवाळे, आमदार प्रसाद लाड आणि पालिकेचे आभार मानून मुंबईतील विकासकामांची माहिती दिली. या कार्यक्रमापूर्वी मान्यवरांच्या हस्ते सौंदर्यीकरण केलेल्या हशु अडवाणी चौकासह पाच वाहतूक बेटांचे देखील लोकार्पण करण्यात आले.