विद्यार्थ्यांसाठी डिजिटल लॉकर
By admin | Published: December 10, 2015 02:37 AM2015-12-10T02:37:44+5:302015-12-10T02:37:44+5:30
मुंबई विद्यापीठाने विद्यार्थ्यांसाठी पदवी प्रमाणपत्र आणि गुणपत्रिकांचे डिजिटल आॅनलाइन व्हेरिफिकेशन करण्याचा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे
मुंबई : मुंबई विद्यापीठाने विद्यार्थ्यांसाठी पदवी प्रमाणपत्र आणि गुणपत्रिकांचे डिजिटल आॅनलाइन व्हेरिफिकेशन करण्याचा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून ही सुविधा सध्या शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसह विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांनाही मिळणार असल्याचे प्रशासनाने सांगितले. देशातील पारंपरिक (दिल्ली, कोलकाता, पुणे, चेन्नई) विद्यापीठांपैकी असा महत्त्वपूर्ण निर्णय घेणारे मुंबई विद्यापीठ हे पहिले विद्यापीठ ठरले आहे. सुरुवातीला २०१५ चे पदवीप्रमाणपत्र उपलब्ध करून दिले जाणार असून, यापुढे जाहीर होणाऱ्या निकालाच्या गुणपत्रिका या योजनेद्वारे विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहेत. स्पर्धात्मक युगात गुणपत्रिका आणि पदवी प्रमाणपत्र याची सत्यता आणि सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे. उद्योगांनी अंगीकारलेल्या आॅनलाइन सुरक्षा पद्धतींचा स्वीकार उच्च शिक्षणामध्ये त्वरित होणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने मुंबई विद्यापीठाने घेतलेला हा महत्त्वाकांक्षी निर्णय आहे. गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी, तसेच पर्यावरणपूरक आणि शाश्वत विकासाच्या दृष्टिकोनातून मुंबई विद्यापीठाने टाकलेले हे एक महत्त्वाचे पाऊल आहे, अशी प्रतिक्रिया विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय देशमुख यांनी दिली.