दिल्ली पोलिसांसाठी डिजिटल ‘स्टोअर रूम’ची व्यवस्था! महाराष्ट्राच्या सुपुत्राची कामगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 01:56 AM2018-01-09T01:56:12+5:302018-01-09T01:56:38+5:30
पोलीस ठाण्यातील स्टोअर रूममध्ये (मालखाना) ठेवण्यात आलेली गुन्हे प्रकरणातील कागदपत्रे किंवा तत्सम साहित्य शोधणे तसे अवघडच. मालखान्याचा प्रमुख रजेवर असेल तर मग उर्वरित पोलिसांची होणारी दमछाक निराळीच.
- सचिन लुंगसे
मुंबई : पोलीस ठाण्यातील स्टोअर रूममध्ये (मालखाना) ठेवण्यात आलेली गुन्हे प्रकरणातील कागदपत्रे किंवा तत्सम साहित्य शोधणे तसे अवघडच. मालखान्याचा प्रमुख रजेवर असेल तर मग उर्वरित पोलिसांची होणारी दमछाक निराळीच. शिवाय मालखान्याचा प्रमुख बाहेर असेल तर तक्रारदारांची रीघही ठरलेलीच. अशा वेळी मालखान्याच्या प्रमुखाव्यतिरिक्त जबाबदारी दिलेल्या व्यक्तीला ही कागदपत्रे शोधणे सोपे व्हावे; यासाठी दिल्लीतल्या शाहदरा जिल्ह्यातील सीमापुरी, जीटीबी एन्क्लेव पोलीस ठाण्यात राबविण्यात आलेला ‘डिजिटल मालखाना’ हा पायलट प्रोजेक्ट आता प्राप्त झालेल्या यशानंतर दिल्लीतल्या सर्व पोलीस ठाण्यांत राबविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे दक्षिण पूर्व जिल्ह्याचे अतिरिक्त उपायुक्त हरेश्वर स्वामी यांना डिजिटल मालखान्याची कल्पना सुचली आणि ती प्रत्यक्षात आली आहे. ते मूळचे महाराष्ट्रतल्या लातूर जिल्ह्यातील तालुका उदगीरमधल्या लोहारा येथील आहेत.
विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहदरा जिल्ह्यातील सीमापुरी, जीटीबी एन्क्लेव पोलीस ठाण्यात डिजिटल मालखान्याची सुरुवात करण्यात आली होती. येथे मिळालेले यश पाहता पोलीस आयुक्त अमूल्य पटनायक यांनी दिल्लीतल्या सर्व पोलीस ठाण्यांत डिजिटल मालखाना सुरू करण्याबाबतचे निर्देश दिले आहेत. डिजिटल मालखान्यात तैनात करण्यात येणाºया पोलिसांना कोरिअर कंपनीकडून प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यामुळे गुन्हे प्रकरणात जप्त करण्यात आलेले साहित्य त्यांना डिजिटल मालखान्यातील लॉकरमध्ये ठेवता येईल. महत्त्वाचे म्हणजे सर्व लॉकरवर क्यूआर कोड लावण्यात येणार आहे. त्याद्वारे मालखान्याचा प्रमुख सहजरीत्या संगणकाच्या मदतीने लॉकरचा शोध घेऊ शकेल. दक्षिण पूर्व जिल्ह्याचे अतिरिक्त उपायुक्त हरेश्वर स्वामी यांना डिजिटल मालखान्याची कल्पना सुचली होती. ही कल्पना सुचली तेव्हा ते सीमापुरी येथे सहायक पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत होते. या वेळी त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात तंत्रज्ञांसमवेत एक बैठक घेतली होती. त्यानंतर डिजिटल मालखान्याच्या संपूर्ण प्रक्रियेची ब्ल्यू प्रिंट तयार करत वरिष्ठांना दाखवली. वरिष्ठांनाही ही कल्पना आवडली. त्यानंतर सीमापुरी येथे डिजिटल मालखान सुरू करण्यात आला.
हरेश्वर स्वामी यांनी यासंदर्भात अधिक माहिती देताना सांगितले की, मालखाना डिजिटल झाल्याने काम करणे सोपे होणार आहे.
असे होणार डिजिटायझेशन
सर्व गुन्हे प्रकरणातील साहित्याला एका लॉकरमध्ये बंद केले जाईल.
या लॉकरवर विशिष्ट असा क्यूआर कोड असेल आणि महत्त्वाचे म्हणजे असाच क्यूआर कोड मालखाना प्रमुख व प्रकरण तपास अधिकाºयाकडे असेल.
संगणकामध्ये क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर कोणत्या प्रकरणातील कोणते साहित्य कोणत्या लॉकरमध्ये ठेवण्यात आले आहे; हे सहजरीत्या ओळखता येईल.