मुंबई : विद्यापीठाच्या २०२२-२३ या शैक्षणिक वर्षांमध्ये विविध नावीन्यपूर्ण योजनांसह अनेक विकासकामांना प्राधान्यक्रम देत मुंबई विद्यापीठाचा ८०९ कोटींचा अर्थसंकल्प बुधवारी उशिरा अधिसभेत सादर करण्यात आला. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अधिसभेत यावर्षीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यावर्षीच्या अर्थसंकल्पात ७३ कोटी ८८ लाख रुपयांची तूट दाखविण्यात आली आहे.
अर्थसंकल्पातील योजना आणि उपक्रमांकरिता स्व. बाळासाहेब ठाकरे कला आणि सांस्कृतिक केंद्र ९ कोटी, डिजिटल युनिव्हर्सिटी ५ कोटी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्रांसाठी ३ कोटी, ग्रॅफिटायझेशन मशीन फॉर मुंबई युनिव्हर्सिटी एक्सलेटर सेंटरकरिता २ कोटी ५० लाख, सामाजिक व आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांना अर्थसाहाय्यासाठी २ कोटी १० लाख, ख्यातनाम शिक्षकांना निवृत्तीनंतर सेवेत कार्यरत ठेवण्यास २ कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. तसेच इंटर्नस अँड एप्रेन्टीसकरिता २ कोटी, डिजिटल लायब्ररीसाठी २ कोटी, सेंटर फॉर एक्सलेंस इन थेरॉटिकल अँड कम्प्युटेशनल सायन्सकरिता २ कोटी, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सची स्थापनेसाठी २ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
नवीन ग्रंथालय फर्निचर १ कोटी, नवीन ग्रंथालय इक्विपमेंट ७० लाख, मुंबई विद्यापीठ माजी विद्यार्थी संघ १ कोटी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थान १ कोटी, विद्यापीठ परिसर सुशोभीकरण १ कोटी, विद्यापीठ परिसर विकास १ कोटी, युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यू सेल ५० लाख, सेंटर फॉर एक्सलेंस इन स्पोर्ट्स सायन्स अँड मॅनेजमेंट ४० लाख, मिनी बससेवा- डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श महाविद्यालय अंबाडवे २५ लाख, सेंट्रल इन्स्टीम्युनिशन फॅसिलिटी २५ लाख, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांसाठी २५ लाखांची तरतूद केली आहे.
एवढा मिळाला निधी
सेंटर फॉर नॅशनल अँड इंटरनॅशनल स्टुडेन्ट्स अँड लिंकेजेस २५ लाख, परीक्षेसाठी पायाभूत सुविधा (रत्नागिरी उपपरिसर) २० लाख, परीक्षेसाठी पायाभूत सुविधा (ठाणे उपपरिसर) २० लाख, परीक्षेसाठी पायाभूत सुविधा (सिंधुदुर्ग उपपरिसर) २० लाख, परीक्षेसाठी पायाभूत सुविधा (पालघर उपपरिसर) १५ लाख, परीक्षेसाठी पायाभूत सुविधा (रायगड उपपरिसर) १५ लाख, मुंबई म्युन्स्टर इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्सड् स्टडीज् १५ लाख, स्वामी विवेकानंद चेअरकरिता १५ लाखांची तरतूद करण्यात आली आहे.